Ahmednagar News : अहमदनगरचे तापमानात दहा दिवसांत ९ अंशांनी घटले, मान्सूनचीही चाहूल

Ahmednagarlive24 office
Published:
mansoon

Ahmednagar News : यंदा उष्णतेने कहर केला होता. अहमदनगरचे तापमानही अगदी ४२ अंशावर गेले होते. परंतु आता शहराचे तापमान कमी होत आहे. काही ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसामुळे व मान्सूनची चाहूल लागल्याने ऊन, उष्णता कमी होत आहे.

बुधवारी कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस इतके होते. साधारण कमाल तापमान सुमारे १० अंश सेल्सिअसने दहा दिवसांपासून कमी झाल्याचे सांगितले जाते. उन्हाची तीव्रता कमी झाली असल्याने आता नगरकरांनी सुटकेचा निःश्वास टाकलाय.

यंदा हवामान बदलांमुळे मागील काही वर्षांचा इतिहास पाहिला तर उन्हाळ्यात दुपारच्या वेळी नगरचा पारा कमाल ४३ ते ४४ अंश सेल्सिअसची पातळी गाठत आहे. दरम्यान आता २५ मेपासून मान्सूनची चाहूल लागल्यामुळे नगर शहर व परिसरातील तापमान वेगाने कमी होत आहे.

काही ठिकाणी पावसाला सुरवात
बुधवारी सायंकाळी नेवासा शहरासह परिसरात यंदाच्या हंगामातील पहिल्याच दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे परिसरातील बळीराजाला दिलासा मिळाला आहे. नेवासा शहरातील बाजारपेठेत पाणीच पाणी झाले होते. शेतातील मशागती उरकल्या आहेत. पावसाने हजेरी लावल्याने कपाशी लागवडीला आता वेग येणार आहे. उसाला हा पाऊस लाभदायक आहे.

नेवासे शहरात सायंकाळी सहाच्या सुमारास पावसाचे आगमन झाले. त्यावेळी एक तास पाऊस झाला. रात्री साडेआठच्या सुमारास पुन्हा पाऊस सुरू होता. गेल्या महिनाभरापासून नागरिक प्रचंड उकाड्याने त्रस्त होते. या पावसामुळे तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

कपाशी, सोयाबीनला पसंतीची शक्यता
यंदा हंगामाच्या अगदी सुरुवातीलाच पाऊस आल्याने खरीप हंगामातील पिकांच्या पेरणी, लागवडीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू होईल. कपाशी, सोयाबीन या पिकांना शेतकऱ्यांकडून पसंती मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोन्ही पिकांचे क्षेत्र वाढण्याचीही शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe