Ahmednagar news : राज्यासह जिल्ह्यात अनेक भागात सध्या वादळी वारे व पाऊस पडत आहे. मात्र या जोरदार वादळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान देखील होत आहे. नुकताच राहुरी तालुक्याच्या पूर्व भागात जोरदार वादळी पावसाने मानोरीत अनेक घरांवरील पत्रे उडाले.
मोठ-मोठी झाडे उन्मळून पडली. विद्युत रोहित्रावर झाड पडल्याने या परिसरातील गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाला. रात्रीच्या या अंधारात वादळी पावसाने हा-हाकार उडवून दिला. अनेकांची धावपळ झाली. सुदैवाने जीवितहानी झाली नसली, तरी मोठे नुकसान होऊन अनेकांचे संसार उघड्यावर पडले.
या वादळाचा जोर एवढा होता की सोमवाडी परिसरातील पाच-सहा घरांवरील पत्रे उडाल. मोठ मोठी झाडे उन्मळून पडली. रोहित्रावर मोठे ग्रीन ट्री पडले. त्यामुळे मुख्य विद्युत प्रवाहाच्या तारा तुटल्या. दोन्ही गावचा विद्युतपुरवठा खंडित झाल्याने सर्वत्र अंधार पसरला. त्यात विजांचा कडकडाट, वादळी वारा आणि जोरदार पाऊस यामुळे एकच धांदल उडाली. या वादळी वाऱ्यात मानोरी येथील एक महिलेच्या नुकतेच घरकुलाचे बांधकाम झालेल्या घरावरील पत्रे लोखंडी अँगल सह उडून शेतात दूरवर जाऊन पडले.
सिमेंटच्या पत्र्याचे अक्षरशः तुकडे, तुकडे झाले, तर लोखंडी पत्रे दूरवर पडले. यावेळी त्या एकट्याच घरात होत्या. त्यांनी भिंतीच्या कोपऱ्यात आसरा घेतला म्हणून त्या वाचल्या.त्याच वेळी संजय गोरक्षनाथ जाधव यांच्या स्वयंपाक घराचे पत्रे उडाले, तर समोरील मोठे लिंबाचे झाड मुळासह उन्मळून पडले. स्वयंपाक चालू असतानाच या वादळी पावसाने पत्रे उडाल्याने महिला मुलांची एकच धावपळ उडाली. सविता गणपत जाधव यांच्या घरावर झाड पडले, तर रामा नारायण जाधव यांच्या स्वयंपाक खोलीचे पत्रे उडून दूरवर गेले. रंगनाथ देवराम जाधव यांच्याही स्वयंपाक खोलीचे पत्रे उडाले. या गोरगरीब आदिवासी कुटुंबावर जणू काही निसर्ग कोपला होता. सुदैवाने जीवितहानी टळली. कोणाला दुखापतही झाली नाही. परंतु परिस्थिती पाहिली तर खूपच भयान दिसत होती. मोठ मोठी झाडे छतांवर अंगणात पडली होती. मानोरी ते आरडगाव रस्त्यालगत असलेल्या रोहित्रावर मोठे ग्रीन ट्री पडल्याने मेन लाईनच्या विद्युत तारा तुटून दोन्ही तिन्ही गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाला. या तुफान वादळी पावसाने आणि वादळी वाऱ्याने एकच धांदल उडून दिली होती.