Ahmednagar news : खासदारांना कोणकोणत्या सुविधा असतात, किती मिळतो पगार; जाणून घेऊया अधिक माहिती…

Published on -

Ahmednagar news : नुकतीच लोकसभेची निवडणूक पार पडली. यात अनेक जुन्या चेहऱ्यांना मतदारांनी घरी बसवले आहे. तेथे आता अनेक नवे चेहरे दिसणार आहेत. या नव्या खासदारांची आता शपथविधीसाठीची तयारी सुरू झाली असून, या खासदारांना सरकार नेमक्या कोणत्या सुविधा पुरविल्या जातात, याबाबत सर्वसामान्यांना नेहमीच कुतूहल असते. या पार्श्वभूमीवर खासदारांना मिळणाऱ्या सोयीसुविधाबाबत जाणून घेऊया अधिक माहिती…

खासदारांचा पगार 
प्रत्येक खासदारास प्रतिमाह १ लाख रुपये मूळ वेतन मिळते. २०१८ मध्ये वाढलेला महागाईचा दर आणि जगण्यासाठीचा खर्च लक्षात घेऊन खासदारांच्या पगारात ही वाढ करण्यात आली होती.

दैनंदिन भत्ता
राजधानी दिल्लीत संसदेचे अधिवेशन, तसेच संसदीय समित्यांच्या बैठका या काळात प्रत्येक खासदारास त्याचे राहणे, खाणे व अन्य खर्च याकरीता प्रतिदिन २ हजार रुपये दैनंदिन भत्ता म्हणून दिला जातो.

कार्यालयीन खर्च
कार्यालयातील कर्मचारी वर्ग, तसेच अन्य खर्चासाठी प्रत्येक खासदारास प्रतिमाह ६० हजार रुपयांचा भत्ता दिला जातो.

मतदारसंघ भत्ता
मतदारसंघात काम करण्यासाठी खासदारास कार्यालय उभारावे लागते. तेथे येणाऱ्यांना चहापाणी करावे लागते, कार्यालयाचे वीज, पाणी, प्रवास आदी खर्च असतात. त्याकरीता प्रत्येक खासदारास ७० हजार रुपये मतदारसंघ भत्ता म्हणून दिला जातो.

वैद्यकीय सुविधा
केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेंतर्गत (सीजीएचएस) खासदार आणि त्यांच्या जवळच्या कुटुंबीयांना मोफत वैद्यकीय सुविधा दिल्या जातात. त्यात सरकारी रुग्णालयांतील, तसेच या योजनेखाली येणाऱ्या निवडक खासगी रुग्णालयांतील उपचारांचा समावेश आहे.

प्रवास खर्च
खासदार आणि त्यांच्या जवळच्या आप्तांना वर्षाला ३४ वेळा देशांतर्गत मोफत विमान प्रवासाची सुविधा देण्यात आलेली आहे. त्यांना रेल्वेचा प्रथम वर्गाने मोफत प्रवासही करता येतो. याच बरोबर ते जेव्हा आपल्या मतदारसंघात वाहनाने फिरतात तेव्हा त्यांना ‘मायलेज अलाऊन्स ‘वरही दावा करता येतो.

निवृत्तीवेतन
५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या माजी खासदारांना दर महिन्यास २५ हजार रुपये निवृत्तीवेतन दिले जाते. या ५ वर्षांपेक्षा अधिक कार्यकाळ पूर्ण केलेल्या खासदारास प्रत्येक वर्षासाठी २ हजार रुपये प्रतिमाह अशी अधिक रक्कम दिली जाते.

घर आणि निवास

खासदारांना त्यांच्या ५ वर्षांच्या कार्यकाळात दिल्लीतील उच्चभ्रू भागात बिगर भाड्याचे निवासस्थान दिले जाते. त्यांच्या ज्येष्ठतेनुसार त्यांना बंगला, सदनिका वा वसतिगृहातील खोली असे दिले जाते. जे अधिकृत निवासस्थान घेत नाहीत, त्यांना दर महिन्यास निवास खर्च म्हणून २ लाख रुपयांच्या भत्त्यावर दावा सांगता येतो.

दूरध्वनी आणि इंटरनेट
खासदारांना वर्षाला दीड लाख मोफत कॉल दिले जातात. याशिवाय त्यांच्या घरी आणि कार्यालयांत मोफत वेगवान इंटरनेट जोडणी दिली जाते.

पाणी आणि वीज
खासदारांना दर वर्षाला ५० हजार युनिट मोफत वीज, तसेच ४ हजार लिटर पाणी मोफत पुरवले जाते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News