Ahmednagar News : छात्रभारती विद्यार्थी संघटनेने विद्यार्थ्यांकडून घेतलेली वाढीव फी परत देण्याबाबत केलेल्या मागणीवर कोणतीच कार्यवाही न केल्याने संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शिक्षणअधिकाऱ्यांना कार्यालयात कोंडले होते. हि घटना संगमनेर महाविद्यालयात घडली.
इयत्ता अकरावी जुनियर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांकडून अकरावी व बारावी प्रवेश प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणावर फी वसूल करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांकडून घेतलेली वाढीव फी तात्काळ परत करावी, इयत्ता अकरावी, बारावी प्रवेश प्रक्रिया शासनाच्या परिपत्रकानुसार करावी, अशी मागणी छात्र भारती संघटनेने केली होती. व बारावीच्या प्रवेश प्रक्रियेतील गोंधळामुळे छात्र भारती संघटनेने संगमनेर महाविद्यालयात शुक्रवारी सायंकाळी आंदोलन केले.
विद्यार्थ्यांकडून घेतलेली वाढीव फी परत देण्याबाबत कार्यवाही न झाल्याने विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शिक्षणअधिकाऱ्यांना काही वेळ कार्यालयात कोंडले होते. अखेर लेखी पत्र मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
संगमनेर शहरातील श्रमिक महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून प्रवेश प्रक्रियेत जास्त फी घेतल्याच्या निषेधार्थ छात्रभारती विद्यार्थी संघटनेचे राज्य कार्यवाह अनिकेत घुले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. संगमनेर महाविद्यालयात आलेले शिक्षण अधिकारी एस.एस. थोरात आणि उपशिक्षणाधिकारी आकाश दरेकर हे महाविद्यालयात आल्यानंतर त्यांच्यासोबत कार्यकर्त्यांनी चर्चा केली. परंतु त्यातून मार्ग न निघाल्यामुळे संतप्त झालेल्या छात्र भारतीच्या कार्यकर्त्यांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना महाविद्यालयामध्येच सायंकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास कोंडून घेतले.
याप्रसंगी छात्र भारतीच्या तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वरी सातपुते, दत्ता ढगे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
शिक्षण विभागाच्या अधिकारी आणि संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण गायकवाड यांच्यात वाढीव फी बाबत चर्चा झाली. त्यानंतर ७ दिवसात या वाढीव फी बाबतचा अहवाल शिक्षण विभागाला सादर करावा, असे निर्देश शिक्षणाधिकाऱ्यांनी प्राचार्यांना दिले. यानंतर कार्यकर्त्यांनी आपले आंदोलन स्थगित केले. विद्यार्थ्यांकडून घेतलेली वाढीव फी परत करण्यासाठी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी ७ दिवसांची मुदत मागितली आहे. पुढील सात दिवसात विद्यार्थ्यांना वाढीव फी परत दिली नाही, तर महाविद्यालयाचे गेटबंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा छात्र भारतीचे राज्य कार्यवाह अनिकेत घुले यांनी दिला आहे.