Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील वक्फच्या मिळकतीत करण्यात आलेल्या अतिक्रमणांवर हातोडा चालवण्यात आला. ही कारवाई श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान याठिकाणी करण्यात आली.
येथील श्रीरामपूर-नेवासे राज्यमार्गालगत असलेल्या दावल मलिक दर्गा या वक्फच्या मिळकतीत करण्यात आलेले अतिक्रमणे हटवली. ही कारवाई महसूल विभागाने पोलिस बंदोबस्तात केली आहे.

येथील दावल मलिक दर्गा वक्फच्या जमिनीवर अतिक्रमण झाल्याचा मुद्दा गेली अनेक वर्षे गाजत आहे. अखेर संभाजीनगर खंडपीठाच्या अतिक्रमण निष्कासित करण्याच्या आदेशानंतर शुक्रवारी, १४ जून रोजी सकाळी ११ वातता महसूल व पोलिस प्रशासनाचा मोठा ताफा अतिक्रमण स्थळी दाखल होऊन अखेर सायंकाळी ५ वाजता प्रशासनाने आतिक्रमणावर हातोडा चालवून कारवाई केली.
येथील दावल मलिक दर्गा रहमतुल्लाची वक्फची मिळकत गट नंबर २४९ मध्ये टाकळीभान-श्रीरामपूर राज्य मार्गालगत आहे. राज्यमार्गा लगतच्या मिळकतीवर अतिक्रमण झाल्याच्या मुद्यावरून वक्फ मिळकतीचे मुजावर इमाम बादशहा शेख यांनी दावा दाखल केला होता.
गेली काही वर्षे हा वाद न्यायालयात सुरू होता. यावर खंडपीठाने आदेश पारीत केले होते. यावर उपविभागीय अधिकारी श्रीरामपूर यांनी वक्फ अधिनियम १९९५ च्या तरतुदीनुसार अतिक्रमण काढून टाकण्याचे आदेश पारीत केले होते.
तहसीलदार मिलिंदकुमार वाघ महसूल, भूमिअभिलेख, सार्वजनिक बांधकान व महावितरणचा लवाजमा घेवून अतिक्रमण स्थळी दाखल झाले. सायंकाळी ५ वाजता आतिक्रमाण हटवण्याची मोहीम सुरू करण्यात आली. या वेळेत काही आतिक्रमण धारकांनी दुकानातील साहीत्य काढून घेतले होते.
यावेळी मंडळाधिकारी प्रशांत ओहळ, तलाठी कचेश्वर भडकमवाल, श्रीरामपूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी व त्यांचे सहकारी पोलिस उपस्थित होते.