Ahmednagar News : जेऊर येथील भवानी माता मंदिरात चोरी झाल्याची घटना शुक्रवार दि. २१ रोजी उघडकीस आली आहे. गर्भगिरीच्या डोंगर माथ्यावर असलेल्या भवानी माता मंदिरात चोरट्यांनी डल्ला मारल्याने ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जेऊर येथील भवानी माता मंदिर डोणी तलाव परिसरातील डोंगर माथ्यावर वसलेले आहे. मंदिर जीर्णोद्धाराचे काम सुरू असून येथे जीर्णोद्धारासाठी आणलेले साहित्य ठेवण्यात आले होते.

चोरट्यांनी मंदिरातील घंटा, लोखंडी साखळ्या व जीर्णोद्धारासाठी आणलेले स्टील चोरून नेले आहे. शुक्रवारी देवीचे भगत काळे कुटुंब देवीची पूजा करण्यासाठी मंदिरावर गेले असता त्यांना हा प्रकार दिसून आला.
एमआयडीसी पोलिसांच्या वतीने पोलीस भगवान वंजारी, सुशांत दिवटे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दोन महिन्यांपूर्वी जेऊरगावचे ग्रामदैवत देवी बायजामाता मंदिराचे कुलूप तोडून मंदिरात चोरीचा प्रयत्न करण्यात आला होता. चोरट्यांनी आपला मोर्चा धार्मिक स्थळांकडे वळवल्याने ग्रामस्थ तसेच भक्तांमध्ये नाराजी दिसून येत आहे.
धार्मिक स्थळांवर डल्ला मारण्याचे काम चोरट्यांकडून गेल्या काही दिवसांपासून होत आहे. तसेच शेतकऱ्यांचे शेतीचे अवजारे व पाळीव जनावरांची चोरीच्या घटना देखील घडलेल्या आहेत. त्यामुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण असून पोलिसांनी गस्त वाढविण्याची मागणी करण्यात येत आहे.
देवीचे भगत जय भवानी उद्योग समूहाचे संचालक संतोष काळे, गोरक्षनाथ काळे त्याचबरोबर मायकल पाटोळे, समीर शेख यांनी भवानी माता मंदिर परिसरात जाऊन पाहणी केली. अहमदनगरमधील शहरासह ग्रामीण भागात चोऱ्यांचे प्रमाण प्रचंड वाढले असून नागरिक त्रस्त झाले आहेत. पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.