मराठा आरक्षणाची धग पुन्हा नव्याने पेटेल असे चित्र आहे. नुकतेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे यांच्यावर ‘मराठा समाजाचे आंदोलन भरकटत चालले असून मनोज जरांगे म्हणजे मराठा समाज नव्हे’ टीका केली होती. आता याला मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिउत्तर दिले आहे.
मराठ्यांच्या लोकांनी मराठ्यांवर आरोप करणे बंद केले पाहिजे, तुमच्यामुळे एक दिवशी जात मरेल त्यामुळे तुम्ही लवकर शहाणे व्हा असा सल्ला त्यांनी मंत्री विखे यांना दिला आहे. शिवाय मी जातीवादी नसून राज्यात जे काही होतोय ते भुजबळ घडवून आणतायेत असा घणाघात त्यांनी केला.
काय म्हणाले होते मंत्री विखे
मराठा समाजाचे आंदोलन आता भरकटत चालले आहे. मनोज जरांगे पाटील म्हणजे संपूर्ण मराठा समाज नाही, अशा शब्दात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी जरांगे पाटील यांना टोला लगावला.
भाजपच्या पराभवाचे चिंतन करण्यासाठी विखे- पाटील २३ जून रोजी नांदेडात आले होते.
यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. विखे पाटील म्हणाले की, मराठा समाजाचे आंदोलन आता भरकटत चालले आहे. समाजासाठी काम करणारे भरपूर लोक असून आम्ही सुध्दा कार्यकर्ते आहोत.
एकटे जरांगे म्हणजे सगळा मराठा समाज नव्हे, असे मी यापूर्वीही म्हणालो आहे. मी सुध्दा ग्राऊंडलेव्हलवर काम करतो, जरांगेच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणे गरजेचे नाही, असे ते यावेळी म्हणाले.
मनोज जरांगे यांचा तिखट पलटवार
मनोज जरांगे यांनी यास प्रतिउत्तर दिले आहे. ते म्हणाले हे आंदोलन भरकटले नसून मराठा समाज हा 1984 पासून कुणबीत असून राज्यातील सर्व मराठा हा कुणबी आहे हे मी सांगतोय. कधीतरी जातीकडून देखील बोलले पाहिजे, तुमच्या वडिलांचे मोठे योगदान आहे परंतु आता तुम्ही देखील मराठ्यांच्या लेकरांसाठी, खरे बोलले पाहिजे.
नगर जिल्ह्यामधील ओबीसी आमदार येथे येऊन ओरडत आहेत. ते नाही भरकटले व मी कायद्याला धरून बोलतोय तरी पण हे आंदोलन भरकटले असे तुम्ही कसे म्हणू शकता. मराठ्यांच्या लोकांनी मराठ्यांवर आरोप करणे बंद करा तुमच्यामुळे एक दिवशी जात मरेल अशी टिप्पणी त्यांनी केली आहे.