Ahmednagar News : मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मान्सूनची वाटचाल वेगाने सुरू आहे. नगर जिल्ह्यातही सर्वदूर मान्सून धडकल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या पावसामुळे आता शेती कामांना वेग आला असून, या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाल्याने वाढत्या उष्म्याने हैराण झालेल्या जनतेला काहीसा दिलासा मिळाला आहे.
नगर जिल्ह्यात जून महिन्याच्या सुरुवातील मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी चांगला पाऊस झाला आहे.त्यामुळे अनेक भागातील शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे तर काही भागात पेरणी करत आहेत. दि. २४ जूनपर्यंत प्रत्यक्षात सरासरी १५१.३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

नगर शहरासह जिल्ह्यात या वर्षी मृग नक्षत्राच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. विशेष करून कर्जत, जामखेड, श्रीगोंदा तालुक्यातील काही महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. यासह नगर, शेवगाव, संगमनेर तालुक्यातील काही मंडळात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे.
नगर जिल्ह्याच्या दक्षिण भागात दमदार पाऊस झाला आहे त्यामुळे या भागात पेरण्या उरकत आल्या आहेत. मात्र उत्तरेत अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे या भागातील शेतकरी दमदार पावसाची वाट पाहत आहेत.
दरम्यान जिल्ह्याच्या उत्तरेतच अनेक मोठी धरणे आहेत. जी शहरासह अनेक गावांची तहान भागवत आहेत. एकीकडे दक्षिण भागात दमदार पाऊस कोसळत असताना दुसरीकडे मात्र धरणाच्या पाणलोटात मात्र अद्याप रिमझिमच सुरु आहे. परिणामी या धरणांच्या पाण्याने तळ गाठला आहे.
जिल्ह्यात ७ व ८ जूनला मध्यरात्री जोरदार पावसाने हजेरी लावली. असह्य उष्णतेने अस्वस्थ झालेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळण्यास सुरुवात झाली आहे. दुसरीकडे खरीपच्या पेरण्यासाठी शेतकर्याकची लगबग सुरू झाली असून कपाशी लागवडीसाठी शेत तयार करण्यात शेतकरी व्यस्त दिसत आहेत.
दक्षिण जिल्ह्यात कडधान्य पिकांचे क्षेत्र अधिक असून झालेल्या पावसामुळे कडधान्य पिकांच्या पेरणीला सुरूवात होणार आहे. कृषी विभागाच्यावतीने पुरेशा प्रमाणात पाऊस झाल्याशिवाय पेरण्यांना सुरूवात न करण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे.
जिल्ह्यात अनेक महसूल मंडळात मोठ्या पावसाची प्रतिक्षा असल्याने पुढील काही दिवसात पाऊस झाल्यानंतर सर्वदूर पेरण्यांना सुरुवात होणार आहे.
नगर जिल्ह्यात तालुकानिहाय झालेला पाऊस
जिल्ह्यात कर्जत तालुक्यात सर्वाधिक म्हणजे सरासरी २५२.७ मि.मी.इतका पाऊस आतापर्यंत पडला आहे. त्यापाठोपाठ श्रीगोंदा तालुक्यात २३९.४, पाथर्डी तालुक्यात २१८, जामखेड तालुक्यात २०५.७, नगर तालुक्यात १७९, पारनेर १५२.३, शेवगाव १२२.९ , नेवासा १२०.७, राहुरी १२०.४, संगमनेर ९४.७, अकोले ७८.७, कोपरगाव १०४.७, श्रीरामपूर १०९.७ आणि राहाता तालुक्यात १२४.८ मि.मी. इतका पाऊस झाला आहे.