Ahmednagar News : अन्न भेसळ व औषध प्रशासनाचे अधिकारी असल्याचे भासवून दुकान तपासणीच्या नावाखाली आलिशान कारमधून आलेल्या चौघांनी किराणा, स्वीटहोम तसेच बेकरी व्यावसायिकांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार श्रीगोंदा तालुक्यातील अजनुज, अनगरे, कौठा, तर शिरूर तालुक्यातील तांदळी येथे घडला.
दरम्यानच्या काळात हा तोतया अधिकारी आणि त्याचे चारचाकी आलिशान वाहन दुकानांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. या तोतयाविरुद्ध श्रीगोंदा पोलीस ठाण्यात कोणत्याही व्यावसायिकाने अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल केलेली नाही.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील भिमा नदी पट्टयातील अजनुज, अनगर, कौठा तर शिरूर तालुक्यातील तांदळी येथील काही किराणा दुकान, स्वीट होम तसेच बेकरी व्यावसायिकांकडे रविवार दि.२३ रोजी दुपारी २ ते ३ वाजण्याच्या सुमारास आलिशान चारचाकी गाडीतून आलेल्या चारजणांनी ते अहमदनगर येथील अन्न व औषध भेसळ प्रशासन विभागातून आल्याचे सांगत दुकानाची तपासणी करणार असल्याचे सांगितले.
किराणा दुकानाची तपासणी करताना महाराष्ट्रात गुटखा बंदी असताना गुटखा का विकता तसेच अनेक माल भेसळयुक्त आहे. असा सज्जड दम देऊन चार महाठकांनी तसेच स्वीट होम, बेकरी, या व्यावसायिकांना दुकान स्वच्छ नसल्याचे कारण पुढे करून तसेच भेसळयुक्त पदार्थ विकता, याबाबत कारवाई करावी लागेल, अशी धमकी दिली.
या धमकीला घाबरून व्यावसायिकांनी त्यांच्याशी कारवाई न करण्याच्या बदल्यात आर्थिक तडजोड केली. या तडजोडीत २० ते ३० दुकादारांकडून प्रत्येकी ५ हजार ते १० हजार रुपये तर एका व्यावसायिकाकडे गुटखा सापडल्याने ५० हजार रुपये घेत व्यावसायिकांना लाखो रुपयांचा गंडा घातला. तसेच पैसे मिळाल्याची नोंद त्यांच्या वहीत करून इथून पुढे असेच सहकार्य केल्यास आपणही सहकार्य करू, असे सांगून तेथून पोबारा केला.
दरम्यानच्या कालावधीत कारवाईसाठी आलिशान चारचाकी गाडीतून आलेले चार तोतया अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकारी दुकानांच्या सीसीटिव्ही कॅमेरात कैद झालेले आहेत. दरम्यान, श्रीगोंदा तालुक्यात मागील दोन तीन दिवसांत आमच्या विभागाचा अधिकारी अथवा कर्मचारी दुकाने तपासण्यासाठी गेलेला नाही. याबाबत वरिष्ठांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल अशी प्रतिक्रियाअन्न सुरक्षा अधिकारी प्रदीप कुटे यांनी दिली आहे.