Ahmednagar News : विदर्भात पुढील पाच दिवस मेघ गर्जना, विजांचा कडकडाट ३० ते ४० किमी वेगाने वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विदर्भ, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या बहुतांश भागात तर पालघर, ठाणे, पुणे, नाशिक, नंदुरबार, धुळे या जिल्ह्यांमध्ये ४० ते ५० किमी वेगाने वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील २४ तासांत दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्र व कोकणाच्या उर्वरीत भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.
देशातील काही भागांत मुसळधार पाऊस झाला तर काही भागांत अद्यापही पावसाची प्रतिक्षाच आहे. त्यातच आता पुढील पाच दिवस पश्चिम किनारपट्टीला पाऊस झोडपणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सोमवार ते शुक्रवारपर्यंत देशाच्या पश्चिम किनारपट्टी प्रदेशात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महाराष्ट्रातही पावसाची स्थिती म्हणावी तशी चांगली नाही. काही भागांत पावसाची प्रतिक्षा कायम आहे. राज्यातील कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र, गोवा, आणि अरुणाचल प्रदेशातील घाट भागात पुढील पाच दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच दक्षिण किनारपट्टीअंतर्गत कर्नाटक, केरळ याठिकाणी देखील अतिमुसळधार पावसाची शक्यताही भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.