Ahmednagar News : कृषी विभागाच्या भरारी पथकांकडून तपासणी करत गेल्या महिनाभरात ३५ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तसेच १३ पेक्षा अधिक केंद्रांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. यासह जिल्ह्यात २ ठिकाणी थेट गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे अशा प्रकारे होणाऱ्या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी जिल्ह्यात १५ भरारी पथकाची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक सुधाकर बोराळे यांनी दिली आहे.
यंदाच्या खरिपात काही भागात चांगला पाऊस झाला आहे तर काही भागात पडत आहे. त्यामुळे शेतकरी पेरणी करत आहेत, त्यामुळे बाजारपेठेत कपाशी सोयाबीन कडधान्य पिकाच्या बियाण्यांना मोठी मागणी असून बियाण्यांचा काळाबाजार, चढ्या दराने विक्रीच्या तक्रारी वाढल्या आहेत.

या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर कृषी विभाग बियाणे खते आणि कीटकनाशकांचा काळाबाजार रोखण्यासाठी ॲक्शन मोडवर आले आहे. अचानक भेटीद्वारे कृषी विभागाने कृषी केंद्रांची तपासणी करत कारवाई सत्र सुरू केले आहे.
जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी बाजारात बियाणे खतांची टंचाई भासणार नाही काळाबाजार होणार नाही लिंकिंग होणार नाही याची दक्षता घेण्याच्या आदेश कृषी विभागाला दिल्यानंतर जिल्हा पातळीवरून स्वतंत्र आणि तालुका पातळीवर चौदा अशा एकूण पंधरा पथकांद्वारे कृषी केंद्राची तपासणी केली जात आहे.
विक्रीसाठी येणारे बियाणे, विक्री झालेले बियाणे, शिल्लक साठ्याची बॅच नंबरसह तपासणी केली जात आहे. माहिती अद्यावत न ठेवणाऱ्या कृषी केंद्र चालकांवर तसेच काळाबाजार करणाऱ्यांवर थेट कारवाई करण्यात येत आहे . त्यानुसार शेतकऱ्यांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागाने भरारी पथक नेमून नजर ठेवली जात होती. अहमदनगर जिल्ह्यात भरारी पथकांकडून तपासणी करत त्रुटी आढळून आलेल्या ३५ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित करण्याची कारवाई केली आहे.
जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस पडत आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी पेरणीची तयारी शेतकर्यांनी सुरू केली आहे. बाजारपेठेत कपाशी, सोयाबीन यासह कडधान्य पिकांच्या बियाणांना मोठी मागणी आहे. यामुळे बियाणांचा काळाबाजार करत चढ्या दराने विक्री केली जात आहे. त्यामुळे कृषी विभाग कृषी केंद्राची तपासणी करण्यात येत आहे.