नगर अर्बन बँकेची फसवणूक करणारे अनेकजण मोकाट ; त्यांना अटक करा.. अन्यथा ?

Published on -

Ahmednagar News : नगर अर्बन बँकेतून कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेवून बँकेची फसवणूक करणारे अनेक कर्जदार राजरोसपणे शहरात फिरत आहेत. परंतु, त्यांना अटक केली जात नाही.या बँक घोटाळ्याप्रकरणी फॉरेन्सिक ऑडिटमध्ये १०५ आरोपी निष्पन्न झाले असताना आतापर्यंत केवळ १५ च्या आसपास आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

एकही मोठ्या संचालक किंवा कर्जदारास अटक झालेली नाही. रेकार्डला आरोपी म्हणून नोंद असताना देखील पोलिस कारवाई का करीत नाहीत, असा प्रश्न जनसामान्यांना पडला असून पोलिसांनी गोरगरीब ठेवीदारांचे पैसे परत मिळण्यासाठी आपले अधिकार प्रभावीपणे वापरुन आरोपींना अटक करावी, अशी मागणी बँकेचे जागृत सभासद राजेंद्र चोपडा यांनी केली आहे.

आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अर्बन बँक कर्ज फसवणूक प्रकरणी डॉ.निलेश विश्वास शेळके याला सोमवारी दुपारी अटक केली आहे. या प्रकरणातील यापूर्वी अटक केलेले पंधरा ते सोळा जण जेलमध्ये आहेत.

या पार्श्वभूमीवर राजेंद्र चोपडा यांनी पोलिस अधीक्षक राकेश ओला यांना एक पत्र दिले आहे. यात नमूद केले आहे की, नगर अर्बन बँकेची थकबाकी ८२० कोटी रुपयांची असून ३०० कोटींचा घोटाळा झालेला आहे.

अनेक गोरगरीब ठेवीदारांचे पैसे बँकेत अडकले आहेत. बँकेच्या लुटणाऱ्या अनेकांची नावे फॉरेन्सिक ऑडिटमध्ये निष्पन्न झाली आहेत. पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केल्यास कायद्याच्या भीतीने अनेक जण बँकेचे पैसे भरतील. परंतु पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने सगळे आरोपी निर्धास्त आहेत.

त्यांना अटक होत नाही तसेच त्यांच्या मालमत्ताही जप्त होत नाहीत. बँकेतील काही संचालक व काही अधिकारी यांनी संगनमताने हा गंभीर आर्थिक गुन्हा केलेला आहे. एखाद्या हायप्रोफाईल गुन्ह्यात किंवा पुण्यातील पोर्शे कार अपघातासारख्या गुन्ह्यात मुख्यमंत्री, गृहमंत्री स्वतः वैयक्तिक लक्ष घालून कारवाईबाबत पोलिसांना सूचना देतात.

दुर्देवाने नगर शहरात इतका मोठा आर्थिक घोटाळा होवून सुध्दा गृहमंत्री गांभीर्याने लक्ष देण्यास तयार नाहीत. या प्रकरणात तातडीने गांभीर्याने लक्ष घालून आरोपींवर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा हायकोर्टात दाद मागण्याचा इशारा राजेंद्र चोपडा यांनी दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News