Ahmednagar Politics : आगामी विधासभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. सर्वच पक्ष आता आपापल्या पद्धतीने आगामी नियोजजन करू लागले आहे. लोकसभेच्या यशानंतर शरद पवार गट आता जोमाने कामाला लागला असून अहमदनगरमधील रणनीती आखली जात आहे. दरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी मोठे विधान केले आहे.
आगामी विधासनभा निवडणूकीसाठी पाथर्डी-शेवगाव मतदारसंघातून अॅड. प्रताप ढाकणे यांना उमेदवारी द्यावे. त्यासाठी आपण आग्रही आहोत, जर तसेच झाले नाही तर, पक्षाच्या जिल्हा अध्यक्ष पदाचा राजीनामा देवू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी दिला.
खासदार नीलेश लंके यांच्या विजयासाठी अॅड. ढाकणे जिवाचे रान केले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राचे चित्र बदलले आहे. मिळालेले यश प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नाचे फळ आहे, असे फाळके म्हणाले.
शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकारिणी निवडीच्या संदर्भात शुक्रवारी (ता. २८) शेवगाव येथे मेळावा झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रदेशचे सरचिटणीस अॅड. प्रताप ढाकणे, केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष ऋषिकेश ढाकणे, शेवगाव तालुकाध्यक्ष हरिश भारदे, पाथर्डीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे आदींसह मान्यवर उपस्थित होते.
अॅड. ढाकणे म्हणाले..
लोकप्रतिनिधींचा प्रशासनावर वचक राहिलेला नाही. त्यांनी दहा वर्षांचा लेखाजोखा मांडावा. टक्केवारीमुळे रस्त्याची गुणवत्ता राहिली नाही. सहा महिन्यात रस्ते फुटायला लागलेत, टक्केवारीच्या घोळामुळे शेवगाव पाणी योजनेसह मतदारसंघ विकासापासून वंचित राहिला आहे.
लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे मतदार संघातील प्रश्न जैसे थे आहेत. त्यामुळे २ जुलैपासून आपण शेवगाव, पाथर्डी मतदारसंघातील गावांमध्ये शिवार यात्रा काढणारा असून, त्यात वाड्यावस्त्यांवर फिरून घोंगडी बैठका घेत सर्व प्रश्न समजून घेणार आहोत. जनतेने संधी दिली तर आमदार कसा असतो, हे दाखवून देईन, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशचे सरचिटणीस प्रतापराव ढाकणे यांनी केले.
यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा जिल्हाध्यक्ष फाळके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या मेळाव्यासाठी शेवगाव -पाथर्डी तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.