Ahmednagar News : जमीन हडपण्यासाठी कोरोना काळात कोरोनाची लागण झाल्याचे भासवून एका ज्येष्ठ नागरिकाला लोणी काळभोर टोल नाक्याजवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्या व्यक्तीचा खून केला, असा आरोप मृत व्यक्तीच्या मुलाने केला आहे.
याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशावरून हडपसर पोलिसांनी ब्राम्हणी येथील दोघांसह एकूण तीन जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीत एका पोलिस कर्मचाऱ्याचा समावेश आहे.
नारायण बापू तेलोरे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी गणेश विलास पोटे (वयः ३७ रा. मांजरी हडपसर), विलास नारायण तेलोरे (वय: ५७), आकाश विकास तेलोरे (वय: २८) दोघे रा. ब्राह्मणी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी राजेंद्र नारायण तेलोरे (वय: ४५ रा. खळवाडी ब्राह्मणी) यांनी फिर्याद दिली आहे. गणेश पोटे हा पोलिस कर्मचारी तर विलास आणि आकाश हे दोघे फिर्यादी यांचे चुलते व पुतणे आहेत. राजेंद्र तेलोरे यांनी पुण्याच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात फौजदारी किरकोळ अर्ज दाखल केला होता.
विलास आणि आकाश हे फिर्यादी यांच्या आई- वडिलांना जमिनीसाठी त्रास देत होते. दि. १४ मे २०२१ रोजी गणेश पोटे याने फिर्यादीच्या वडिलांना मांजरी येथे आणले. शिवम हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
तसेच त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे सांगितले. वडिलांच्या मृत्यू बाबत विचारणा केली असता राजेंद्र तेलोरे यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन घाईघाईने वडिलांवर अंत्यसंस्कार केले असे म्हटले आहे.
मृत्यूबाबत संशय
वडिलांच्या मृत्यू बाबत संशय आल्याने फिर्यादी राजेंद्र यांनी हॉस्पिटलमधील डॉक्टरांकडे विचारणा केली. मात्र, त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. डॉक्टरने पोटे यांना बोलावून घेतले. पोटे याने फिर्यादीस धमकी दिली. तसेच मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.