Ahmednagar news : अहमदनगर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात शाखा असलेल्या नगर अर्बन बँकेच्या संचालकांना केलेल्या चुकीच्या कारभारामुळे बँकेत मोठा आर्थिक घोटाळा झाला आहे. या घोटाळ्यामुळे या बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे.
यामुळे या बँकेत अनेक सर्वसामान्य नागरिकांच्या ठेवी अडकल्या आहेत. यातील काहीजण अटक आहेत तर काहीजण फरार आहेत. अनेकजण आपल्या परीने यातून दिलासा मिळण्यासाठी प्रयत्न करत होते . मात्र आता नगर अर्बन बँकेच्या २९१ कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी संचालकांना केंद्रीय सहकार मंत्रालयाने दणका दिला आहे.

बँकेत पैशांचा गैरविनियोग करणारे संचालक तसेच वरिष्ठ व कनिष्ठ अधिकाऱ्यांवर त्यांची जबाबदारी निश्चित करण्याचे व त्यांच्याकडून ते पैसे वसुलीचे आदेश बँकेचे अवसायक गणेश गायकवाड यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे केंद्रीय सहकार मंत्रालयानेही कारवाईची प्रक्रीया सुरु केली आहे.
याप्रकरणी नुकतीच ज्येष्ठ वकील अच्युत पिंगळे यांनी केंद्रीय सहकार मंत्रालयाकडे ३१ मे रोजी तक्रार केली होती. व अर्बन बँक बुडविणाऱ्यांवर जबाबदारी निश्चितीची मागणी त्यांनी केली होती.
या मागणीची दखल घेत केंद्रीय सहकार निबंधक सुर्यप्रकाश सिंग यांनी बँकेच्या अवसायकांना पत्र पाठवून बँकेचे संचालक तसेच वरिष्ठ व कनिष्ठ संचालक तसेच वरिष्ठ व कनिष्ठ अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून त्यांच्याविरूद्ध मल्टीस्टेट को ऑप सोसयटी कायदान्वये व तरतुदीनुसार कारवाई करून त्यांच्याकडून वसूल करावी व त्याचा अहवाल तातडीने पाठविण्याचे आदेश दिले आहेत.
याबाबत बँकेचे माजी संचालक व बँक बचाव कृती समितीचे प्रमुख राजेंद्र गांधी यांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात माजी अध्यक्ष अशोक कटारीया, माजी संचालक अनिल कोठारी व मनेश शाठे तसेच अधिकार्यांपैकी राजेंद्र डोळे, प्रदीप पाटील, राजेंड्र लुणिया, मनोज फिरोदीया यांच्यासह काही कर्जदार असे मिळून १४ ते १५ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.