Ahmednagar News : जामखेड येथील रत्नदीप मेडिकल महाविद्यालय संस्थेत सात संस्था चालतात. त्यात अतिनियमता दिसुन येत आहे. या संस्थेवर कारवाई करून उच्च तंत्रज्ञान विभागामार्फत चौकशी करून मान्यता रद्द करण्यात येईल. हरिण प्रकरणी वनविभागा मार्फत शासकीय स्तरावर चौकशी समिती नेमली जाईल, असे आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.
रत्नदीप वैद्यकीय महाविद्यालयाविरोधात आमदार राम शिंदे यांनी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित करीत विद्यार्थ्यांचे दुसऱ्या महाविद्यालयात समायोजन करा, तसेच चौकशीसाठी उच्चस्तरीय चौकशी समिती नेमा व रत्नदीपच्या सर्व परवानग्या रद्द करा, अशा मागण्याही त्यांनी केल्या. त्यावर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विद्यार्थ्यांची इतर महाविद्यालयांत समायोजनाची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले.

जामखेड येथील रत्नदीप मेडिकल फाउंडेशन या महाविद्यालया विरोधात तीन महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. त्यावेळेस विविध विभागाच्या समित्यांनी पाहणी केली. एकाच इमारतीत ७ वेगवेगळी महाविद्यालये सुरू असल्याचा अहवाल आहे. एवढे असताना त्या एकाच इमारतीत ७ महाविद्यालयांना परवानगी कोणी दिली व कशी दिली, अशा प्रश्नाचा भडिमार आमदार शिंदे यांनी केला.
रत्नदीप संस्था व संस्थाचालक भास्कर मोरे याने विद्यापीठाची केलेली फसवणूक, विद्यार्थ्यांची केलेली आर्थिक, शारीरिक व मानसीक पिळवणूक, विद्यार्थ्यांना धमकावने असे गंभीर प्रकार रत्नदीप संस्थेत घडले आहेत.
तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतर स्थापन केलेल्या समितीने काय कार्यवाही केली, संस्थेच्या नियम व त्यांचे उल्लंघन केले त्यांची केलेली फसवणूक या अशा सर्व प्रकरणांच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती नेमण्याची मागणी यावेळी आमदार शिंदे यांनी केली.
रत्नदिप महाविद्यालयाचा अध्यक्ष भास्कर मोरे याच्यावर वन विभागाने महाविद्यालयाच्या आवारात हरीण जखमी अवस्थेत अढळून आल्याने गुन्हा दाखल केला होता. व्हिडिओमध्ये दोन हरणे होती. त्यातील एक जखमी अवस्थेत सापडले. तसेच आवारात खोदकाम केल्यानंतर हरणाचे काही अवशेष सापडले, हे प्रकरण गंभीर असून याचीही सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
दरम्यान मोरेवरही विद्यापीठ व शासनाकडून कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे भोसले व विद्यार्थ्यांनी पुन्हा उपोषण सुरू केले. ते तिसऱ्या दिवशीची सुरूच होते.