Ahmednagar Politics : महायुतीमध्ये सध्या भाजपकडून अजित दादांना लक्ष्य केले जात आहे. राज्यपातळीवर नेते मंडळींचे मनोमिलन झाले आहे, मात्र स्थानिक पातळीवर अजूनही कार्यकर्त्यांचे मनोमिलन झालेले नाही.
लोकसभा निवडणुकीत मोठी पडझड झाली. त्याला भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल असलेली नकारात्मकताच कारणीभूत आहे. अजित दादांमुळे तर महायुतीला यश मिळाले आहे. ते जर महायुतीमध्ये नसते तर गडकरी वगळता एकही जागा भाजपला मिळाली नसती. त्यामुळे अजित दादांना महायुतीतील भाजप व शिंदे गटाकडून लक्ष्य झाल्यास राज्यापातळीवरच वेगळी भूमिका द्यावी लागेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा यांनी दिला.
राष्ट्रवादीची बैठक आज नाहाटा यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. बैठकीत तालुकानिहाय राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यात आला असून त्याचा अहवाल प्रदेशला पाठविण्यात येणार आहे. येत्या ४ जुलैला मुंबईत संपूर्ण राज्याची बैठक होणार आहे. असे सांगून नाहाटा म्हणाले की, भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी अजितदादांना लक्ष्य केले जात आहे. हे चुकीचे आहे.
सुदर्शन चौधरी यांनी अजितदादा बद्दल केलेल्या वक्तव्याची दखल भाजपने घेऊन त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. तर महायुती एकसंघ राहिल, अन्यथा वेगळे होण्यास वेळ लागणार नाही.
लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांची मोठी पडझड झाली. त्याला काही राज्य सरकारची धोरणे देखील कारणीभूत आहेत. दुध दरवाढ, दुधाचे अनुदान, कांदा दर यामुळेच महायुतीच्या जागा घटल्या. मात्र त्यात आता सुधारणा केली आहे.
आता राष्ट्रवादीला देखील जिल्हा नियोजनमधून २५ टक्के निधीचा वाटा मिळणार आहे. राज्यपातळीवर ठरल्याप्रमाणे आता पालकमंत्र्यांना नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेते व कार्यकर्त्यांना त्यांच्या भागातील विकास कामांना २५ टक्के निधी द्यावा लागणार आहे.
त्यानुसार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आपल्या भागातील कामांची यादी जिल्हाध्यक्षांकडे द्यावी. त्यानंतर ही कामे जिल्हाध्यक्षांच्या शिफारशीनुसार मंजूर केली जाणार असल्याचे नाहाटा यांनी स्पष्ट केले. लोकसभेत भाजपचे ऐकले आता ऐकणार नाही. त्यांच्या सर्वे नुसार जागा वाटप होणार नाही तर पक्षाला आवश्यक आहे ती जागा यावेळी आम्ही घेणार असल्याचे नाहाटा म्हणाले.
जिल्ह्यातील ८ जागांवर दावा
नगर जिल्ह्यातील ८ विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी दावा करणार असून त्या जागा पक्षाला मिळाव्यात असा प्रयत्न राहणार आहे. त्यात कोपरगाव, अकोले, श्रीरामपूर, राहुरी, श्रीगोंदा, कर्जत-जामखेड, पारनेर व नगर शहर या आठ जागा मागणार आहेत. ४ जुलै रोजीच्या बैठकीत महायुतीमध्ये पक्षाला ८ जागांची मागणी करणार आहे.
मंत्री विखेंवरही आरोप
मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दुध अनुदान वाटपाचे योग्य नियोजन केले पाहिजे होते. त्यांनी ते न केल्याने शेतकऱ्यांना दुधाचे अनुदान जाचक अटीमुळे मिळले नाही, त्याचा लोकसभेत परिणाम झाला असून महायुतीच्या जागांचा पडझड झाली.
मंत्री विखे व डॉ. सुजय विखे हे ऐकत नाही. त्यांना अनेक गोष्टींची कल्पना दिली. फोन उचला, संपर्क साधा पण नाही ऐकले. ते गंभीर न झाल्याने पडझड झाल्याचे नाहाटा यांनी बोलून दाखविले.