Ahmednagar News : निर्यातबंदीमुळे कांद्याचे कोसळलेले भाव तसेच दुधाच्या दरात झालेल्या कपातीच्या निषेधार्थ खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी शेतकरी जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे.
शुक्रवार दि.५ जुलै रोजी सकाळी १० वाजता या आंदोलनास सुरूवात होणार असून या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.
या आंदोलनासंदर्भात खा. लंके यांनी जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांना निवेदन सादर केले असून त्यात नमुद करण्यात आले आहे की, राज्यातील कांदा व दुध उत्पादक शेतकरी योग्य भाव न मिळाल्यामुळे आर्थिक संकटात सापडला आहे. दुधाचे भाव गेली वर्षभर सातत्याने कोसळत आहेत.
सध्या दुधाला मिळणाऱ्या भावामध्ये दुध उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही त्यातून निघत नसल्याने राज्यातील शेतकरी मेताकुटीला आलेला आहे. सरकारने दुधाला अनुदान देण्याची घोषणा केली खरी परंतू अनुदानाच्या जाचक अटी व शर्तींमुळे शेतकऱ्यांना त्याचा लाभ हेात नाही. नुकतीच केंद्र सरकारने दहा हजार टन दुध पावडर आयात करण्याचा निर्णय घेतला आहे.
विशेष म्हणजे ही आयात करमुक्त असल्यामुळे दुध उत्पादकांना त्याचा मोठा फटका बसणार आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की, केंद व राज्य सरकारच्या धोरणांमुळे शेती तोटयात जाऊ लागली आहे. वाढलेली महागाई, नैसर्गिक आपत्ती, खतांचे वाढलेले दर, सरकारचे शेतीमालासंदर्भातील चुकीचे धोरण, रासायनिक खते, बी-बियाणे, किटकनाशके, शेती औजारे यांच्या माध्यमातून जी. एस.टी. चा शेतकऱ्यांवर बोजा पडलेला आहे.
मात्र देशभरातील जनतेला अन्नधान्य पुरविणाऱ्या शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर सरकारला दिसत नाही. यातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी सरकारने संपूर्ण कर्जमाफीसह तात्काळ विविध उपाययोजना करणे आवष्यक आहे.
राज्यातील शेतकऱ्यांमध्ये दुध आणि शेतीमालाच्या हमी भावावरूनप प्रचंड असंतोष आहे. यासाठी अनेक शेतकरी संघटना विविध आंदोलने करीत आहेत. शेतकऱ्यांच्या दुधाला ४० रूपये दर मिळावा, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, कांदा व इतर शेतीमालाला योग्य हमीभाव मिळावा या मागणीसाठी हजारो शेतकरी, दुध उत्पादक तसेच विविध शेतकरी संघटनांसह ५ जुलै रोजी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचे खा. लंके यांच्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे.