पारनेर तालुक्यातील निघोज येथील जत्रा हॉटेलवर जेवणावरून तुफान राडा झाला. या वेळी आरोपींनी हॉटेल मालकासह वेटरला कोयता व तलवारीने मारहाण केल्याने हॉटेल मालक प्रविण भुकन हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना नगर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती गंभीर आहे.
याबाबत अधिक माहिती पोलिसांना देताना फिर्यादी गणेश भाऊ भुकन यांनी सांगितले की, मंगळवारी रात्री पठारवाडी येथील ओळखीचे युवक हॉटेलवर जेवणासाठी आले होते. यामध्ये आदिनाथ मच्छिद्र पठारे, विशाल खंडू पठारे, शंकर केरु पठारे यांनी माझा भाचा ओंकार अंकुश रसाळ यांच्याकडे जेवणाची मागणी केली. मात्र, हॉटेल बंद झाले आहे, असे रसाळ याने सांगितले.
या वेळी आदिनाथ पठारे याने तुला जेलण द्यावेच लागेल नाही तर आम्ही राडा करू असा दम दिला. वाद नको म्हणून त्याला मी जेवण देण्यास सांगितले, त्यानंतर जेवण चांगले नाही म्हणून आरोपीनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली म्हणून माझा भाऊ प्रविण भाऊ भूकन याने आदिनाथ व त्याच्या सहकाऱ्यांना समजून सांगितले, बिल देऊ नका, मात्र, वाद घालू नका, अशी विनंती केली.
मात्र, आदिनाथ व त्याच्या सहकाऱ्यांनी प्रविण याला मारहाण करण्याचा प्रयल केला तसेच आदिनाथ याने थांबरे मी आमच्या भाईला बोलावतो म्हणून दमबाजी केली. मात्र, त्याची समजूत काढत, विनंती करत व पाया पडत त्यांना बाहेर काढले. रात्री उशिरा निघोज येथे पोलिस स्टेशनमध्ये गेलो. मात्र, त्याठिकाणी कुणी नसल्याने परत आलो.
त्यानंतर मी, माझा भाऊ प्रविण व भाचा व वेटर असे हॉटेलमध्ये असताना मध्यरात्री उशिरा आदिनाथ पठारे, धोंड्या जाघव, शंकर पठारे, विशाल पठारे, प्रथमेश सोनवणे हे माझ्या ओळखीचे पुन्हा आले. या वेळी आदिनाथ पठारे याच्या हातात कोयता, धोंड्या जाधव याच्या हातात तलवार, विशाल पठारे याच्या हातात पाईप, शंकर पठारे याच्या हातात दांडा, अशाप्रकारे त्यांनी सगळ्यांनीच हत्यारे उलटे धरुन आम्हाला मारहाण केली. त्यानंतर धोंड्या जाधव याने माझा भाऊ प्रविण यास तलवारीने मारण्याचा प्रयत्न केला,
यावेळी प्रविण याने तलवारीचा अंगावरील वार चुकविण्यासाठी हात वर केले, ही तलवार दोन्ही हातांवर लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. या वेळी त्याठिकाणी उभा असलेल्या प्रथमेश सोनवणे याने हे माजले आहेत, यांना मारुन टाका, असे म्हणताच धोंड्या जाधव याने माझा भाऊ प्रविण याच्यावर सपासप तलवारीने वार करीत त्याला गंभीर जखमी केले.
मात्र, आम्ही आरडाओरडा करुन बाहेर आलो, आरोपी एक कार व दोन मोटारसायकलवर निघून गेले, त्यानंतर निघोजचे पोलिस कर्मचारी तोरडमल त्याठिकाणी आले. मात्र, माझा भाऊ प्रविण यास गंभीर दुखापत झाल्याने आम्ही त्याला नगर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. या गुंडागर्दी करणाऱ्यांनी आम्हाला मारहाण तर केलीच; परंतु हॉटेलमधील वस्तु फोडून एक लाख रुपयांचे नुकसान केले आहे.
तसेच शंकर पठारे याने प्रिंटर चोरून नेला, अशी फिर्याद गणेश भाऊ भुकन यांनी निघोज पोलीसांत दिली आहे. पारनेरचे पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली निघोज हेड कॉन्स्टेबल गणेश डहाळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलिस तपास सुरू केला असून, सर्व आरोपी फरार झाले आहेत.
धोंड्या जाधव हा सराईत गुन्हेगार असून, पुणे व नगर जिल्ह्यात त्याच्यावर अनेक गुन्हे वाखल आहेत. गेली दोन वर्षांपूर्वी पुणे जिल्ह्यातील एका बँक दरोडयासंदर्भात त्याच्यावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक झाली होती. मात्र, अनेक गुन्हे वाखल असताना तो जामिनावर वारंवार सुटत असून, त्याची नगर व पुणे जिल्ह्यात मोठी दहशत आहे.
तो निघोज येथील कुंड परिसरात राहात असून, पाटर्या करणे, वादागिरी करणे, पैसे न देता अरेरावी करणे असे प्रकार सातत्याने निघोज परिसरात सुरू असल्याने धोंड्यांची मोठी दहशत आहे. या ठिकाणी गुंडागर्दीला उत्तेजन देण्याचे काम तो व त्याचे सहकारी करीत असल्याची माहिती निघोज पोलिसांकडून मिळाली.