गेल्या चार दिवसापासून सुरु असलेल्या भंडारदरा धरणाच्या पाणलोटात पावसाचा जोर अखेर ओसरला असून भंडारदरा धरणामध्ये पाण्याची नवीन आवक होत आहे. सध्या धरणाचा पाणीसाठा १७.७३ टक्के पर्यंत पोहोचला आहे.
अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटामध्ये गेल्या चार ते पाच दिवसांपासून जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे आदिवासी बांधवांची भात खाचरे तुडुंब भरली असून बऱ्याच ठिकाणी भात लागवडी सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे
रतनवाडीची अमृतवाहिनी म्हणून समजली जाणारी प्रवरा नदी दुथडी भरून वाहत असल्याने भंडारदरा धरणाच्या पाण्यामध्ये वाढ होत आहे. भंडारदरा धरणाचा पाणीसाठा पाऊस सुरू होण्याच्या अगोदर अगदी तळाला म्हणजे दहा टक्के वर गेला होता.
त्यामुळे परिसरातील गावांनाही पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत होती मात्र गेल्या पाच ते सहा दिवसांपासून मान्सूनचे जोरदार आगमन झाल्याने सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. धरणाच्या पाणीसाठ्यात नविन पाण्याची आवक होत असल्याने भंडारदरा धरणाचा पाणीसाठा १७.७३ टक्के पर्यंत पोहोचला आहे.
काल बुधवारी (दि.३) भंडारदरा धरणाच्या पाणलोटासह भंडारदरा धरणावर पावसाचा जोर कमी दिसून आला. मात्र सोसाट्याचा वारा अजूनही जोरदार वाहत आहे. काल बुधवारी संध्याकाळी मात्र धरणाच्या पाणलोटासह भंडारदरा धरणावरही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळत होत्या.
मागील १२ तासामध्ये भंडारदरा धरणाचा पाणीसाठा १९५७ दशलक्ष घनफूट झाला असून धरणामध्ये ४६ दशलक्ष घनफुट नवीन पाण्याची आवक झाली आहे. कळसुबाई शिखरावर पडत असलेल्या पावसामुळे कृष्णावंती नदी वाहती झाल्यामुळे वाकी धरणातही नवीन पाण्याची आवक सुरू झाली आहे.
तर वाकी धरणाचा पाणीसाठा ७२.३४ दल घनफूट झाला असून वाकी धरण ६४.२१ टक्के भरले आहे. त्यामुळे वाकी धरणालाही आता भरण्याचे वेध लागले आहे. भंडारदरा धरणामधून धरण लाभक्षेत्रासाठी ११०६ क्युसेसने पाणी सोडण्यात येत आहे.