दूध दराबाबत लवकरच नवीन कायदा ; विखे पिता-पुत्रांना अमित शाह यांचे आश्वासन, दिल्लीत घेतली भेट

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : केंद्र सरकारच्या माध्यमातून दूध दरासंदर्भात लवकरच कायदा आणून शेतकऱ्यांना न्याय दिला जाईल, असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिले. आज सकाळी दिल्ली येथे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शाह यांची सदिच्छा भेट घेतली.

त्यावेळी राज्यातील दूध दरासंदर्भात विखे पाटीलांनी शाह यांचे लक्ष वेधले. त्यानंतर शाह यांनी शेतकऱ्यांना न्याय देण्याचे आश्वासन दिले. स्वतः सुजय विखे पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली.

आज महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी दिल्लीत अमित शाह यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. देशाच्या गृह आणि सहकारमंत्री पदी पुन्हा विराजमान झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या.

शाह यांनीही शुभेच्छा स्विकारत विखे कुटुंबाचे आभार मानले. यावेळी चर्चेत विखे पाटलांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत चर्चा केली. उसाच्या एफआरपी प्रमाणेच दुधासाठी देखील एमएसपीचा कायदा आणून केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी विनंती केली.

त्यानंतर अमित शाह यांनीही याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे सांगत केंद्र सरकारच्या माध्यमातून दुध दरासंदर्भात लवकरच कायदा आणून शेतकऱ्यांना न्याय दिला जाईल, असे आश्वासन दिले.

या भेटीचे फोटो आज दुपारी स्वतः सुजय विखे पाटील यांनी आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवर शेअर केले. या फोटोखाली त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सकारात्मक प्रतिसाद दिल्याबाबत मंत्री शाह यांचे आभारही मानले. सरकार शेतकऱ्यांप्रती कायम सजग आहे, अशी प्रतिक्रीया मंत्री विखे यांनी यावेळी दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe