गणेशोत्सवासाची तयारी सुरु, रेल्वे पाठोपाठ एसटी महामंडळाकडून ऍडव्हान्स बुकिंग सुरू

Published on -

संपूर्ण देश आतुरतेने वाट पाहत असलेल्या गणेशोत्सवाला अवघे दोन महिने राहिले आहेत. रेल्वे प्रशासनाने गाड्यांचे आरक्षण सुरू केले असताना एसटी महामंडळानेदेखील गणेशोत्सवासाठीचे वैयक्तिक आरक्षण गुरुवार, ४ जुलैपासून सुरू केले आहे.

मात्र, समूह (ग्रुप) बुकिंगची मागणी होत असून, साधारण आषाढी एकादशीनंतर ग्रुप बुकिंग सुरू होणार असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे.

७ सप्टेंबर रोजी देशभरात गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. सर्वजण आतुरतेने गणेशोत्सवाची वाट पाहत असताना दुसऱ्या बाजूला गणेशोत्सवासाठी कोकणात अथवा आपल्या मूळगावी जाण्यासाठी चाकरमान्यांनी लगबग सुरू केली आहे.

यासाठी रेल्वे, एसटी बस आरक्षण प्रवाशांकडून केले जात असून, ४ जुलैपासून एसटीचे वैयक्तिक आरक्षण सुरू झाले आहे. कोकणासह राज्यातील सर्व विभागांमध्ये गणेशोत्सव काळासाठीचे नियमित आणि विशेष गाड्यांचे आरक्षण खुले झाले आहे.

मुंबई सेंट्रल, परळ, पनवेल आणि कुर्ला नेहरूनगर येथून २ आणि ३ सप्टेंबरपासून जादा गाड्या सुटणार आहेत. कणकवली, राजापूर, विजयदुर्ग, दापोली, भालावली, देवगडदरम्यान जादा एसटी फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. गणेशोत्सवासाठीचे जादा गाड्यांचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल, असे एसटीतील अधिकाऱ्यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News