गणेशोत्सवात आरक्षण मिळत नाही, अशी तक्रार कायम चाकरमान्यांकडून केली जाते. मात्र, आता यात आणखी भर म्हणजे १ नोव्हेंबर रोजी दिवाळीसारख्या सणासाठीचे रेल्वे आरक्षण देखील फुल झाल्याने चाकरमान्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
प्रतीक्षा यादी १०० पार गेल्याने रेल्वे प्रशासनाने अधिक गाड्या सोडण्याचे नियोजन करावे, तसेच ऑनलाइन तिकीट बुकिंग प्रक्रियेत बारीक लक्ष ठेवत पारदर्शक प्रक्रिया उपलब्ध करावी, अशी मागणी चाकरमान्यांकडून केली जात आहे.
१ नोव्हेंबरपासून दिवाळी सणाला सुरुवात होत आहे. देशभरात दिवाळी सणानिमित्त आपल्या मूळगावी जाण्यासाठी चाकरमान्यांकडून एसटी बस, रेल्वेचे तिकीट आरक्षण करत प्रवास केला जातो.
यंदाही रेल्वेच्या नियमाप्रमाणे १२० दिवसआधीच दिवाळीसाठीचे आरक्षण सुरू झाले आहे. मात्र, अवघ्या काही वेळातच हे आरक्षण फुल झाले आहे. अनेकांना तिकीट खिडकीवरून ‘वेटिंग’ तिकीट घेऊन परतावे लागले, तर ऑनलाइन बुकिंग करणाऱ्यांना ‘रिग्रेट’ मेसेज पाहावा लागत आहे.
यामध्ये मुंबईहून पुणे, मुंबईहून नागपूर, पुणे नागपूर यांसारख्या गाड्या फुल झाल्या असल्याचे निदर्शनास येत आहे.दरम्यान, दरवर्षी दिवाळीत अवघ्या काही मिनिटांत आरक्षण फुल होते. त्यामुळे अनेक प्रवाशांना गावी जाताना अडचणींचा सामना करावा लागतो.
रेल्वे प्रशासनाने यामागची कारणे ओळखत आवश्यक सुधारणा कराव्यात. ऑनलाइन बुकिंग प्रक्रियेत पारदर्शकता आणावी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी अतिरिक्त रेल्वे गाड्या सोडाव्यात, अशी मागणी चाकरमान्यांकडून होत आहे.
३१ ऑक्टोबर २०२४ स्लीपर कोच आरक्षण स्थिती
सीएसएमटी ते नागपूर- दुरांतो एक्स्प्रेस- १२१,
वांद्रे टर्मिनस ते अहमदाबाद- अरवली एक्स्प्रेस- रिग्रेट,
वांद्रे टर्मिनस ते नवी दिल्ली- स्वराज एक्स्प्रेस- ४१,
मुंबई सेंट्रल ते ह. निजामुद्दीन- गोल्डन टेम्पल- ६२.