भंडारदरा धरणाच्या पाणलोटात जोरदार बरसात ; शेतकऱ्यांच्या भातपिकाची लागवड सुरू तर पर्यटकांची … !

Published on -

Ahmednagar News : गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. दरम्यान काहीशी उसंत घेतल्यानंतर पावसाने भंडारदरा पाणलोट क्षेत्रात जोरदार बरसात केली. ओल्याचिंब झालेल्या सह्याद्रीच्या पर्वत रांगांवरून पांढरे शुभ्र धबधबे कोसळू लागले आहेत. पावसाने चांगले आगमन झाल्याने एकीकडे आदिवासी शेतकऱ्यांनी भातपिकाची लागवड सुरू केली आहे. दुसरीकडे फुललेल्या निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची पावले परिसरात वळू लागली आहेत.

जिल्ह्याची चेरापुंजी म्हणून ओळख असणाऱ्या घाटघर, रतनवाडी, पांजरे या परिसरात या वर्षी पावसाचे लवकरच आगमन झाले. मात्र, पुन्हा काही दिवसांत या परिसरात पावसाने ओढ दिली. त्यामुळे फुलत असलेल्या निसर्गाचे नवचैतन्य निस्तेज दिसू लागले. असे असतानाच मागील दोन दिवसांपासून या परिसरावर वरुणराजाची कृपा झाली आणि घाटघर, रतनवाडी, पांजरे येथे धो-धो पाऊस कोसळू लागला.

सुरू झालेल्या पावसाचा जोर अद्यापही कायम आहे. यामुळे निसर्गाला पुन्हा एकदा तजेला आला आहे. डोंगरांच्या टोकांवरून छोटेमोठे अनेक धबधबे कोसळू लागले आहेत. तसेच जोरदार वाऱ्यांमुळे डोंगराच्या शिखराकडे पुन्हा फिरकी घेणारे रिव्हर्स फॉल लक्ष वेधून घेत आहेत.

याबरोबरच भरभरून वाहू लागलेले ओढे आणि नाल्यांमुळे सर्व परिसरच जलमय झाला आहे. भंडारदरा धरणाच्या रिंगरोड सुरुवात होताच येथील जलोस्तव दृष्टिक्षेपात येण्यास सुरुवात होते. उंचच उंच डोंगरावरून वेगवेगळी नावे ठेवलेले धबधबे डोळ्यांचे पारणे फेडल्याशिवाय राहत नाहीत.

धुक्यात हरवलेला घाटघरचा कोकण कडा, कड्याखालून येणारे दाट धुके, त्यापाठोपाठ येणारा सुखद वारा आणि नंतर काही वेळात टपोऱ्या थेंबाने कोसळणारा पाऊस उल्लास निर्माण करत असतो. एकूणच येथील निसर्गखुलला असून, आता हा जलोस्तवाचा आविष्कार पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी सुरू झाली आहे.

आदिवासी पट्ट्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे भातखाचरे तुडुंब भरली आहेत. भात लावणीला वेगाने सुरुवात झाली आहे. डोक्यावर ईरले, घोंगडी व प्लास्टिक कागद घेऊन गाळ तुडवीत भाताची लावणी सुरू झाली आहे. आदिवासी शेतकरी मुलाबाळांसह शेतीच्या कामात गुंतले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe