विठुरायाचे दर्शन २४ तास सुरू, आषाढी यात्रा निमित्त भाविकांना मिळणार जलद व सुलभ दर्शन !

Ahmednagarlive24 office
Published:
vithhal darshan

आषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरपुरात देशभरातून श्री विठ्ठल दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढत आहे. दरम्यान रविवार, ७ जुलैपासून श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे २४ तास मुखदर्शन, तर २२.१५ तास पदस्पर्श दर्शन सुरू करण्यात आले आहे. श्रींचा पलंग काढण्यात आला असून, विठ्ठलाच्या मूर्तीच्या पाठीशी लोड, तर रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या पाठीशी तक्क्या देण्यात आला आहे.

आषाढी एकादशी सोहळा बुधवार, १७ जुलै रोजी होत आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज पायी वारी पालखी सोहळ्यात सहभागी होत असताना अनेक वारकरी हे श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन वारीत सहभागी होत आहेत. त्यामुळे पंढरपुरात वारकऱ्यांची गर्दी वाढू लागली असून, श्री विठ्ठलाचे २४ तास दर्शन सुरू करण्यात आले आहे.

श्रींचा पलंग काढल्याने काकडा आरती, पोशाख, धुपारती, शेजारती आदी राजोपचार बंद होऊन नित्यपूजा, महानैवेद्य व गंधाक्षता हे राजोपचार सुरू राहतील. २६ जुलै (प्रक्षाळपूजा) पर्यंत २४ तास दर्शन उपलब्ध असणार आहे.

श्रींचा पलंग काढताना पूजेवेळी मंदिर समिती सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, समितीचे सदस्य संभाजी शिंदे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, विभाग प्रमुख संजय कोकीळ, अतुल बक्षी, बलभीम पावले व पौरोहित्य करणारे कर्मचारी उपस्थित होते.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून पदस्पर्श दर्शन रांगेत बॅरिकेडिंग करून त्यावर ताडपत्री शेड, जादा पत्राशेडची निर्मिती, आपत्कालीन गेट, विश्रांती कक्ष, फॅब्रिकेटेड शौचालये, बसण्याची सुविधा, लाइव्ह दर्शन, कूलर-फॅन, मिनरल वॉटर वाटप करण्यात येत आहे.

दर्शन रांगेतील भाविकांची गर्दी लक्षात घेता दर्शनरांग जलद व द्रुतगतीने चालवून भाविकांना जलद व सुलभ दर्शन देण्याचा मंदिर समितीचा प्रयत्न राहणार असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe