राज्यात मान्सून सक्रिय होत असून, रविवारी कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली. काही भागांत हलका ते जोरदार पाऊस पडला आहे. दरम्यान, पुढील चार दिवस बहुतांश ठिकाणी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडील भागावर हवेचा दाब तयार होत असल्यामुळे राज्याच्या काही भागांत पाऊस पडत आहे. हवेच्या दाबाच्या परिणामामुळे राज्यात पावसाचे प्रमाण कमी-जास्त होत आहे. रविवारी कोकण भागातील मुंबई, सांताक्रुझ, रत्नागिरी येथे कमी-अधिक पाऊस पडला.
मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, महाबळेश्वर, नाशिक, सांगली, सातारा येथे पावसाने हजेरी लावली. तसेच महाबळेश्वर येथे देखील जोरदार पाऊस पडत असून. मराठवाड्यातील बीड येथे सुद्धा पावसाची नोंद झाली.
विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर, यवतमाळ येथे मध्यम ते मुसळधार पाऊस पडला. तसेच राज्याच्या उर्वरित भागात हलक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे.
राज्यात सर्वात जास्त तापमानाची नोंद वाशिम येथे करण्यात आली. वाशिमचे तापमान ३३.८ अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले. येत्या ८ ते ११ जुलैदरम्यान कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडणार आहे.
काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भागांत यलो अलर्ट असून, काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होणार आहे.