सतत कोसळणाऱ्या पावसामुळे घाटघर रतनवाडी जनजीवन विस्कळीत, घाटघरला नऊ इंच पावसाची नोंद !

Ahmednagarlive24 office
Published:
ghatghar

अहमदनगरची चेरापुंजी समजल्या जाणाऱ्या घाटघरला विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. सतत कोसळत असणाऱ्या पावसामुळे घाटघरचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. घाटघर येथे नऊ इंच पावसाची नोंद झाली असून रतनवाडीला आठ इंच पाऊस पडला आहे. आजवरची पावसाळ्यात ही सर्वात मोठी आकडेवारी समोर आली आहे.

अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाचा पाणलोट क्षेत्र म्हणजे अहमदनगर जिल्ह्याची चेरापुंजी समजली जाते. मागील आठवड्यात भंडारदरा धरणाच्या पाणलोटात पावसाचे जोरदार आगमन झाले होते. तेव्हापासून पाऊस कोसळत असून अद्यापही भंडारदऱ्याच्या पाणलोटासह परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे.

या पडणाऱ्या पावसामुळे मात्र आदिवासी शेतकरी शेतीच्या मशागतीला लागल्याचे चित्र दिसत आहे. शेतकरी भात लागवडीच्या कामाला लागल्यामुळे शेंडीच्या बाजारपेठेत शुकशुकाट जाणवायला सुरुवात झाली आहे.

महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पर्यटनावर बंदी घातली गेल्याने भंडारदऱ्याला पर्यटकांची गर्दी दिसून येत आहे. भंडारदऱ्याचे पर्यटन पर्यटनासाठी अतिशय चांगले असून कुठेही धोकादायक स्थिती नसल्याने पर्यटकांची भंडारदऱ्याला पसंती मिळत आहे.

वन्यजीव विभागाने ही कळसुबाई, हरीश्चंद्रगड अभयारण्यात धबधब्यांच्या आसपास सुरक्षितेच्या दृष्टीने खबरदारी घेतल्याचे दिसून येत आहे. पर्यटकांनी धोकादायक ठिकाणी सेल्फी किंवा रील बनवू नये. पर्यटन करताना धबधब्याखाली न जाता पर्यटनाचा लांबूनच आनंद घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन वन्यजीव विभागाकडून करण्यात आले आहे.

शनिवार व रविवार दोन दिवस सुट्टीचे औचित्य साधून भंडारदऱ्याला पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे दिसून आले. पर्यटकांनी भंडारदऱ्याच्या रिंग रोडला जादा पसंती दिल्याचे दिसत आहे. सतत कोसळत असणाऱ्या पावसामुळे धबधबे वाहते झाल्याने पर्यटक पावसात भिजण्याचा मनसोक्त आनंद घेत आहेत.

गेल्या २४ तासांमध्ये घाटघर येथे २३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून रतनवाडीला २०५ मिलीमीटर पाऊस पडला. पांजरे येथेही १९२ मिलिमीटर पाऊस पडला असून भंडारदरा धरणावर ३५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

२४ तासांमध्ये भंडारदरा धरणाच्या पाण्यामध्ये ४६८ दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक झाल्याने भंडारदरा धरणाचा पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होत आहे. भंडारदरा धरणाचा पाणीसाठा संध्याकाळी सहा वाजेपर्यंत २९४८ दशलक्ष घनफूट झाला असून भंडारादरा धरण २६.७१ % भरले आहे.

शुक्रवारी वाकी धरण १०० टक्के भरले असून आज वाकी धरणावरून ५५६ क्युसेकने पाणी कृष्णावंती नदीमध्ये वाहत असल्याने निळवंडे धरणाच्या पाणी साठ्यातही वाढ होत असल्याची माहिती धरण शाखेने दिली आहे. शनिवारी दिवसभर व रात्रभर भंडारदऱ्याच्या अभयारण्यात मुसळधार पाऊस कोसळत होता तर रविवारी मात्र अभयारण्य सोडता भंडारदरा येथे पावसाने उघडीप दिल्याचे दिसून आले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe