Ahmednagar News : सध्या उत्तरेतील धरणाच्या पाणलोटात जोरदार पाऊस कोसळत आहे तर दुसरीकडे उत्तरेतीलच श्रीरामपूर तालुक्यात पावसाने पाठ फिरवल्याने या भागातील शेतकऱ्यांचे डोळे ढगाकडे लागले आहेत. यापूर्वी केलेली पेरणी वाया जाते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
यंदा जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनच्या पावसाने हजेरी लावली त्यामुळे यावर्षी चांगला पाऊस होईल अशी अशा बाळगत शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली. मात्र यानंतर अत्यंत किरकोळ स्वरूपात पाऊस झाला.

परिणामी पेरणी केलेले बियाणे अत्यंत कमी प्रमाणात उगवले, त्यात परत पुढील काळात पावसाने हुलकावणी दिली त्यामुळे जे थोडे फार उगवले होते ते देखील पावसाअभावी कोमेजून जात आहे. त्यामुळे पुढील काही काळात पदण्डर पाऊस झाला नाही तर दुबार पेरणी करण्याशिवाय शेतकऱ्यांसमोर दुसरा पर्याय नाही.
यंदा जूनच्या पहिल्याच आठवड्यात श्रीरामपूर तालुक्यात एक पाऊस झाला त्यामुळे हंगामाच्या सुरुवातीलाच पाऊस झाला असल्याने यावर्षी चांगला पाऊस येईल या आशेवर शेतक-यांनी सोयाबीन, कापूस आदी खरिपाची पेरणी केली होती.
मात्र त्यानंतर किरकोळ पाऊस झाला. त्यामुळे अनेक भागात पेरलेले काही प्रमाणात उगवले तर काहींनी पेरलेले अद्यापही अंकुरलेले नाही. त्यात परत पावसाने ओढ दिल्याने जे उगवले होते ते देखील आता तग धरेना अशी परिस्थिती निर्माण झाली असून आगामी काळात या भागातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची टांगती तलवार आहे.
यावर्षी २३ हजार ४९१ हेक्टर खरीप पेरणीचे उद्दिष्ट होते. त्यापैकी सोयाबीन १० हजार ९१९ हेक्टर, कपाशी ६ हजार ७०४ हेक्टर, मका ३ हजार ९०० हेक्टर, तर बाजरी ९९.२ हेक्टर अशी ७२ टक्के पेरणी झाली. तर तालुक्यात पाऊसही अत्यल्प झाला.
श्रीरामपूर मंडळात १५९, बेलापूर मंडळात १२८, उंदिरगाव १२२, टाकळीभान मंडळात ११४ मिमी असा सरासरी १३१.४ मिमी पाऊस झाला. मागील वर्षी सोयाबीनच्या भावाने शेतकऱ्यांना रडवले.
सोयाबीन पिकासाठी एकरी सरासरी १२ ते १५ हजार रुपये खर्च येतो. मात्र आजच्या भावाचा विचार करता एकरी २० ते २२ हजारांचे उत्पन्न मिळू शकते. मात्र पीक हातात येईपर्यंत खात्री नसते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबिनकडे पाठ फिरवली.
या उलट कापसाला जरी भाव कमी मिळाला असला तरी उत्पादन चांगले निघते व उत्पन्नही मिळते असे चित्र आहे. म्हणून यावर्षी सोयाबीन पेक्षा कपाशीकडे शेतकऱ्यांचा ओढा दिसत होता. मात्र सोयाबीनची पेरणीही मुबलक प्रमाणात झाली. अजूनही अनेक शेतकरी पेरणीच्या प्रतीक्षेत आहेत.