मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडप्रमाणेच सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यालाही मुसळधार पावसाचा जोरदार फटका बसला आहे. कोकणात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे.
दरम्यान, हवामान खात्याने पुढील तीन दिवस ‘रेड अलर्ट’ दिला असून नदीकाठच्या वस्त्यांतील नागरिकांनी दक्षता घेण्याचा इशारा प्रशासनातर्फे देण्यात आला आहे.
संगमेश्वर तालुक्यात पावसाने रविवारपासूनच जोर धरला असून शास्त्री व सोनवी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. चिपळूणच्या वनखात्याने नदीकाठच्या लोकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
यापूर्वी वाढत्या पाण्याबरोबर मगरींचाही संचार वाढल्याच्या घटना घडल्या असून त्यादृष्टीने सतर्कता बाळगावी, असे आवाहन करण्यात येत आहे. लांजा-राजापूरमध्येही मुसळधार पाऊस कोसळला. राजापूरच्या जवाहर चौकात पुराचे पाणी साचले होते. राजापूरच्या अर्जुना नदीने इशारा पातळी गाठली आहे.
चिपळूण, गुहागर, दापोली, मंडणगड या भागासही पावसाचा तडाखा बसला आहे, सिंधुदुर्गमध्ये शनिवारी मध्यरात्रीपासून पावसाचे थैमान सुरू आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून ओरोस येथील जिजामाता चौकात, मुंबई-गोवा मार्गावर सुमारे अडीच ते तीन फूट पाणी साचल्याने तेथील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती.
पावसामुळे ‘आयडॉल ‘ने ही परीक्षा पुढे ढकलल्या
मुसळधार पावसाने मुंबईतील जणजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या दूर आणि ऑनलाइन शिक्षण केंद्राने (‘सीडीओई’ पूर्वीचे ‘आयडॉल’) सोमवारी पहिल्या सत्रात म्हणजेच सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व परीक्षा बुधवार, १३ जुलै रोजी होतील, असे आयडॉलने स्पष्ट करत परीक्षेची वेळ व परीक्षा केंद्रात कोणताही बदल नसेल, असेदेखील सांगितले.
मुंबई विद्यापीठाची बी.एससी. हॉस्पिटॅलिटी स्टडीज या अभ्यासक्रमाची पाचव्या सत्राची ‘एटीकेटी’ परीक्षा सोमवारी नियोजित होती; परंतु रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील स्थानिक प्रशासनाने सुट्टी जाहीर केल्यामुळे ती पुढे ढकलण्यात आली आहे. या परीक्षेची सुधारित तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, असे मुंबई विद्यापीठ प्रशासनाने जाहीर केले आहे.