Ahmednagar News : खरंतरं कर भरणा हा सर्वांनीच केला पाहिजे. त्यातून अनेक विकासात्मक कामे मार्गी लागतात. परंतु अहमदनगर शहरात अनेक लोक असे आहेत की ती भरणा करत नाहीत. त्यामुळे जवळपास २३० कोटी रुपयांची थकबाकी या करचुकवेगिरी करणाऱ्यांवर थकली आहे.
मध्यंतरी महापालिकेने शास्ती माफी, मालमत्तांची जप्ती तसेच नळ कनेक्शन बंदची कारवाई केली होती. असे असले तरी अद्यापही थकबाकीदारांनी कर भरलेला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा मोठे थकबाकीदार महापालिकेच्या रडारवर आलेले असून प्रभारी आयुक्त सौरभ जोशी यांनी कर बुडव्यांवर कारवाई करा, असे आदेश दिलेत.

या आदेशानंतर वसुली विभाग पुन्हा एकदा ऍक्शन मोडवर आलेले आहे. जोशी यांनी सोमवारी मनपात उपायुक्त, प्रभाग अधिकारी आणि वसुली विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेत पाच लाखांच्या पुढील थकबाकीदारांना लक्ष्य करून त्यांच्याकडून कर वसूल करा, असे आदेश दिले.
तसेच शहरात खासगी संस्थेमार्फत सुरू असलेल्या मालमत्ता सर्वेक्षणाचा दैनंदिन आढावा घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. दरम्यान मनपाची मालमत्ताधारकांकडे मागील आणि चालू अशी एकूण २३० कोटी रुपयांची थकबाकी आहे.
मार्च एण्डच्या पार्श्वभूमीवर थकबाकी वसुलीसाठी मनपाने मालमत्ताधारकांना १६ ते ३१ मार्चदरम्यान ७५ टक्के शास्तीमाफी जाहीर केली होती. या सवलतीकडे करदात्यांनी दुर्लक्ष करत थकबाकी भरली नाही.
त्यामुळे मनपाने अनेकांच्या मालमत्तांची जप्ती करत नळ कनेक्शनही बंद केले. मध्यंतरी दोन ते अडीच महिने ही कारवाई थांबली होती. कर वसुलीसाठी मनपा पुन्हा सतर्क झाली असून थकबाकीदारांवर कारवाई केली जाणार आहे.
अशी आहे थकबाकी
मागणी-२५४.२६ कोटी
वसूल- २४.०८ कोटी
शिल्लक- २३०.२ कोटी