Ahmednagar News : अहमदनगर मनपाचे तत्कालीन आयुक्त पंकज जावळे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्यानंतर ते फराराही झाले आहेत. आता त्यांच्या जागी कुणाची नियुक्ती होणार याकडे अनेकांचे लक्ष लागले होते.
आता अहमदनगर महानगर पालिकेच्या आयुक्तपदी देविदास पवार यांची नियुक्ती करण्यात आली असून तसा आदेश नगरविकास विभागाने काढला असल्याची माहिती समजली आहे.

नगर महापालिकेला आयुक्त दर्जाचा अधिकारी मिळावा व तोही डॅशिंग असावा अशी मागणी नागरिकांमधून होऊ लागलेली होती. देविदास पवार यांच्या नियुक्तीचे नगरकरांनी स्वागत केले आहे. पवार हे मूळ नांदेड जिल्ह्यातले रहिवासी आहेत.
त्यांचे शिक्षण परभणी इथे पूर्ण झाले. आयुक्त पवार यांची १९९६ मध्ये परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात पहिली नियुक्ती झाली. त्यानंतर त्यांचा कामाचा आलेख उंचावत राहिला. पवार यांनी यापूर्वी परळी, लातूर, विरार, यवतमाळ, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ येथे मुख्याधिकारी म्हणून काम पहिले आहे.
परभणी, जळगाव येथे आयुक्त पदाची जबाबदारी सांभाळलेली आहे. २२ वर्षे प्रशासकीय सेवा झाली असून अनुभवी प्रशासक, आयुक्त आता नगरमहापालिकेला मिळाले आहेत.
अनेक आव्हाने
महापालिकेच्या नगररचना, बांधकाम, घनकचरा व्यवस्थापन, अतिक्रमण, आरोग्य, पाणीपुरवठा आदी विभागात काही घोटाळेबाज अधिकारी असल्याचे अनेकदा नागरिक चर्चा करतात. यात किती सत्यता आहे ते त्यांनाच माहित असेल.
त्यामुळे अशा काही अधिकाऱ्यांवर जरब ठेवण्याचे महत्वाचे आव्हान आता पवार यांच्यावर असणार आहे. तसेच नागरिकांच्या अनेक समस्या आहेत त्या देखील प्रकर्षाने सोडाव्या लागणार आहेत. तसेच करवसुलीसाठी विविध प्रयत्न देखील करावे लागणार आहेत.