Ahmadnagar News : अकोले तालुक्यातील मुळा खोऱ्यातील आंबित धरण अगोदर भरले. या नंतर पिंपळगाव खांड भरून वाहू लागले. या पाठोपाठ प्रवरा खोऱ्यातील वाकी ओव्हरफ्लो झाले.
यानंतर पुन्हा रविवारी मुळा पट्टयातील शिरपुंजे- देवहंडी, तर सोमवारी प्रवरा खोऱ्यातील टिटवी, असे एकूण पाच लघु पाटबंधारे तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत. यामुळे मुळा नदीच्या विसर्गात, तर निळवंडे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे .

शनिवारी व रविवारी हरिश्चंद्रगडाच्या पर्वतरांगांतील मुळा खोऱ्यात मुसळधार पाऊस कोसळला. या पावसामुळे परिसरातील ओढे-नाले भरून वाहत होते, तर भात खचरेही तुडुंब भरून वाहू लागली.
पडलेल्या या पावसामुळे कुरकुंडी नदीवर १५५ दलघफू क्षमतेचा शिरपुंजे शिवारात बांधण्यात आलेला हा लघु पाटबंधारे तलाव रविवारी सकाळी पूर्ण क्षमतेने भरला आणि सांडव्यातून पाणी पुढे नदीपात्रात पडू लागले. पुढे ही नदी मुळा नदीला मिळते. त्यामुळे आता मुळेच्या विसर्गात भर पडणार आहे.
सोमवारी सकाळी पूर्ण क्षमतेने भरल्याने ओव्हरफ्लो झाला. प्रवरा खोऱ्यातील टिटवी पाटबंधारे तलावाच्या पाणलोट क्षेत्रातही मागील तीन दिवस पडलेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे. या तलावाच्या सांडव्यावरून पडत असलेले पाणी पुढे निळवंडे धरणात अडवले जात आहे. त्यामुळे आता निळवंडे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे.
मुळा, भंडारदरा व निळवंडे पाणलोटक्षेत्रात गेल्या दोन ते चार दिवसापासून सुरु असलेल्या पावसाने नदी, नाले, ओढे वाहत येऊन जलाशयात पाण्याची आवक वाढत आहे. आज दिवसभर पाणलोटक्षेत्रात पावसाने उघडीप घेतली.
यामुळे शेतकऱ्यांची आता भात आवणीची लगबग सुरु झाली आहे. डोगरदऱ्यातून ओढ्या नालेद्वारे पाणी फेसाळत वाहत असल्याने हळूहळू एक एक धरण भरु लागले आहे.
दिवसभर घाटघर येथे ४६ मिमी., रतनवाडी ४७ मिमी., पांजरे ३० मिमी., भंडारदरा २ मिमी. एवढा पाऊस झालेला असून काल दिवसभरात भंडारदरा धरणात ३०६ दलघफूट नवीन पाण्याची आवक होऊन भंडारदरा धरणाचा ३०३७ पाणीसाठा होऊन धरण २८ टक्के भरले आहे.