Ahmadnagar News : नेहमीप्रमाणे नगर शहर पाणी पुरवठा योजनेवरील मुख्य उपसा केंद्र असलेल्या मुळानगर पंपींग स्टेशन येथील जलवाहिन्या फुटल्याने मुळा नगर येथून होणारा पाणी उपसा बंद करण्यात आलेला आहे.
दुरुस्तीच्या कामास अवधी लागत असल्याने शहरासाठीचा दैनंदिन पाणी उपसा मध्यवर्ती भागासह उपनगरात दोन दिवस उशिराने व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.असे महापालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

सध्या राज्यासह जिल्ह्याभरात दोन दिवसांपासून दमदार पाऊस कोसळत आहे. तसेच हवामान विभागाने देखील दोन दिवस जिल्ह्यात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. सध्या सुरु असलेल्या पावसाने देखील अनेक भागात पाणी पाणी झाले आहे. मात्र मनपाच्या ढिसाळ कारभाराचा फटका नगरकरांना बसत आहे.
नगर शहर पाणी पुरवठा योजनेवरील मुख्य उपसा केंद्र असलेल्या मुळानगर पंपींग स्टेशन येथील जलवाहिन्या फुटल्याने या जलवाहिनेद्वारे मुळानगर येथून होणार पाणी उपसा बंद करण्यात आलेला आहे. दरम्यान या जलवाहिनी दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. परंतु जलवाहिनी दुरुस्तीच्या कामास जास्त अवधी लागणार आहे.
त्यामुळे या काळात शहर पाणी वितरणाच्या टाक्या निर्धारित वेळेत भरणे शक्य होणार नाही. त्यामुळे ९ जुलै रोजी रोटेशन नुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागास म्हणजे मंगलगेट, रामचंदखुंट, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दाळमंडई, माळीवाडा, कोठी या भागात व गुलमोहर रोड, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हील हडको, प्रेमदान हडको, टी.व्ही. सेंटर परिसर, म्युनिसिपल हडको इ. भागात उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.