Ahmadnagar News : महसूलच्या नाकावर टिच्चून संगमनेर तालुक्यात वाळू उपसा चालू आहे. प्रवरा नदीच्या काठावर असलेल्या अनेक गावात मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला जात आहे. केवळ या काही गावात नाही तर तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू आहे.
यात विशेष म्हणजे गावातील सरपंचानेच वाळूचा साठा करून ठेवला आहे. मात्र याबाबत खबर लागताच तलाठी त्या गावात पोहोंचले व त्यांनी या वाळूचा पंचनामा केला. परंतु याबाबत नोटिसा देताना ती चक्क त्यांच्या पत्नीच्या नावाने नोटीस बजावली आहे. हि घटना संगनमेर तालुक्यातील पठार भागातील एका गावात घडली आहे. या प्रकाराने मात्र महसूल विभागाचा सावळा कारभार चव्हाट्यावर आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, धांदरफळ खुर्द हे संगमनेर तालुक्यातील संगमनेर शहराच्या पश्चिमेला ११ किलोमीटर अंतरावरील गाव आहे. हे गाव प्रवरा नदीतीरी वसलेले आहे. या गावात तलाठी नसल्याने परिसरातून वाळू तस्कर मोठ्या प्रमाणात नदीतून वाळू उपसा करत असून रात्रीच्या वेळी या भागात प्रवास करणे देखील धोकादायक ठरू लागले आहे. त्यामुळे महसूल विभागाने वाळू तस्करांवर त्वरित कठोर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी गावकरी करत आहेत.
तर दुसरीकडे पठार भागातील दुसऱ्या एका गावात चक्क सरपंचानेच वाळूसह गौण खनिजचा साठा केल्याने तलाठ्याने त्या सरपंचाच्या नावाने पंचनामा केला आहे. गावातील मोकळ्या जागेत ६ ब्रास वाळू मिळून आली आहे. केलेल्या वाळू साठ्याबाबत तलाठ्यांनी पावती अथवा परवान्याबाबत विचारणा केली असता त्यांना काही सादर करता आले नसल्याचा पंचनामा करण्यात आला आहे.
परंतु महसूलचा प्रताप इथेच थांबला नाही तर पंचनाम्यात पुरुषाचे नाव घेतले तर नोटीस बजावताना त्याच्या पत्नीला बजावली असल्याने संगमनेर तालुक्यातील तलाठ्यांचा प्रताप समोर आला आहे.
त्यामुळे आता वरिष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यांसह अवैध साठा करणाऱ्यांवर काय कारवाई करणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. महसूल विभागाने या भागातील वाळू तस्करांवर त्वरित कठोर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी गावकरी करत आहेत.