Ahmednagar News : शाळा शिकण्याच्या वयात अल्पवयीन मुलामुलीस वीस तीस हजार रुपयांमध्ये विकत घेऊन तिच्याकडून कबाडकष्ट करून घेतले जात असल्याचे धक्कादायक प्रकार अहमदनगर जिल्ह्यातून समोर आले आहेत.
मुलांची विक्री करणारी टोळी कार्यरत असून विकत घेतलेल्या मुलांना गुलामासारखी वागणूक देत असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. रायगड जिल्ह्यातील बारा वर्षीय मुलाची वार्षिक तीस हजार रुपयांत वेठबिगारीसाठी पारनेर तालुक्यातील मेंढपाळाला विक्री करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
या मुलाची सोडवणूक करत मेंढपाळावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर शहर परिसरात मेंढ्या चारत असलेले बबन सावळेराम बडकरे (वय ६०), गंगुबाई बबन बडकरे (वय ५२) यांच्याकडे एक लहान मुलगा मेंढ्या चारण्याचे काम करत असताना दिसला.
याबाबत कामगार अधिकारी तुषार बोरसे यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांना प्राप्त झालेल्या तक्रारीवरून ५ जुलै रोजी पथक कारवाईसाठी गेले असता मेंढपाळ कुटुंबाने संबंधित मुलगा आपला नातू असल्याचे सांगितले.
तसेच त्याचे नावही चुकीचे सांगितले. तो मेंढ्या चारण्यासाठी तो गेल्याचे सांगितले. परंतु, स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधींनी मेंढपाळ कुटुंब चुकीचे नाव सांगत असल्याचे सांगितल्याने दुसऱ्या दिवशी पथक पुन्हा कारवाईसाठी गेले. तर, संबंधित मुलाची भेट घेतली असता तो रायगड जिल्ह्यातील असल्याचे समोर आले. तो वर्षाकाठी ३० हजार रुपयांच्या मोबदल्यात मेंढपाळ म्हणून काम करीत असल्याची माहिती समोर आली.
मुलगा मेंढपाळाच्या ताब्यात असताना तो आपण याच कुटुंबातील असल्याचे सांगत होता. मात्र, मुलाची सुटका करून पथक त्याला बालसुधारगृहात घेऊन आले तेव्हा मुलाने खरी माहिती लगेच सांगितली. सुटका केल्यानंतर मुलाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहात होता, असे पथकाचे म्हणणे आहे.
आणखी एक घटना
पारनेर तालुक्यातील काही गावांत गरीब, दारिद्र्य, अशिक्षित, दुर्बल, आदिवासी कुटुंबातील १० बालकांची तस्करी करून त्यांचे आर्थिक, मानसिक, शारीरिक व लैंगिक शोषण होत असल्याची माहिती श्री अमृतवाहिनीचे संस्थापक दिलीप गुंजाळ यांना मिळाली होती.
खातरजमा करून गुंजाळ, सिराज शेख, मंगेश थोरात, ऋतिक बर्डे, मथुरा जाधव यांनी काही ठिकाणी भेट देऊन माहिती घेतली. त्यात एक आदिवासी कुटुबांतील १३-१४ वर्षाची मुलगी आढळून आली. गेली तीन-चार वर्षापासून ही मुलगी काकणेवाडी या ठिकाणी दिवसरात्र कष्ट करत होती.
तिला पंधरा हजार रुपयात विकत घेऊन बंदिस्त केल्याचे प्राथमिक माहिती समजली. श्री अमृतवाहिनीच्या स्वयंसेवकांनी जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ व पोलिस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन माहिती दिली. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने धाड टाकून बालिकेची सुटका केली.