आठ महिन्यांत नऊ लग्न करणारी ‘सिमरन’ टोळीसह गजाआड, लग्नाळुंना हेरून ‘असा’ टाकायची डाव

पोलिसांनी पकडलेल्या टोळीतील सिमरनने आठ महिन्यांत तब्बल नऊ तरुणांशी लग्न केलेय. लग्नाळुंना हेरून त्यांना लाखो रुपयांना चुना लावल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

Ahmednagarlive24 office
Published:
crime

Ahmednagar News : बातमीचे टायटल वाचूनच धक्का बसला असेल ना? पण हे खरे आहे. पोलिसांनी पकडलेल्या टोळीतील सिमरनने आठ महिन्यांत तब्बल नऊ तरुणांशी लग्न केलेय. लग्नाळुंना हेरून त्यांना लाखो रुपयांना चुना लावल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील मुंगूसगाव येथील तरुणाशी लग्न करून २ लाख १५ हजार रुपये घेऊन डोळ्यात मिरची टाकून पळून जाणाऱ्या नवरीला आणि तिच्या नातेवाईकांवर श्रीगोंदा पोलिस ठाण्यात फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला.

गुन्ह्याचा अधिक तपास करत असताना श्रीगोंदा पोलिसांनी बनावट लग्न करुन फसवणारी अंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करत या प्रकरणी ७ जणांना ताब्यात घेत रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेल्या गाड्या असा सुमारे १३ लाख ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार श्रीगोंदा तालुक्यातील मुंगूसगाव येथील नितीन अशोक उगले वय ३१ या तरुणाशी यवतमाळ जिल्ह्यातील सिमरन पाटील या तरुणीशी मुलीच्या नातेवाईकांनी मध्यस्थी मार्फत २ लाख १५ हजार रुपये घेऊन जून महिन्यात सध्या पद्धतीने देवळात लग्न लावले होते.

लग्नाची न्यायालयात नोंद करण्यासाठी गेले असता नवऱ्या मुलीने आणि तिच्या आईने श्रीगोंदा न्यायालयासमोर मुलाच्या आईच्या डोळ्यात मिरची पूड टाकून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता.

प्रसंगावधान राखत न्यायालयातील वकिलांनी आणि मुलाच्या नातेवाईकांनी नवऱ्यामुलीला आणि तिच्या सोबत असणाऱ्यांना पोलिसांच्या ताब्यात देत नितीन अशोक उगले याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला.

ही आहे टोळी
आशा गौतम पाटील, सिमरन गौतम पाटील, शेख शाहरूख शेख फरीद, दीपक पाडुरंग देशमुख, अर्जुन रामराव पाटील ऊर्फ कर्णन गौतम पाटील (रा. सर्वजण चोरंबा, ता. घाटंजी, जि. यवतमाळ), सचिन बलदेव राठोड ऊर्फ राजूरामराव राठोड (रा. वरुड, ता. पुसद, जि. यवतमाळ), युवराज नामदेव जाधव (रा. नंदपूर मोहा, ता. पुसद, जि. यवतमाळ) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

एजंटामार्फत शोधायचे लग्नाळू तरुण
पोलिसांनी अटक केलेली सिमरन पाटीलची टोळी ही मूळची यवतमाळ जिल्ह्यातील आहे. मात्र, वारंवार गावे बदलून ते राहत होते. ज्या ठिकाणी जायचे, तेथे घर भाड्याने घेऊन राहायचे. स्थानिक एजंटामार्फत लग्नाळू तरुणांशी संपर्क करायचे.

किमान तीन ते पाच लाख रुपयांची मागणी करायचे. लग्न झाले की, मुलगी दुसऱ्या किंवा तिसऱ्याच दिवशी दागिन्यांसह पसार व्हायची.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe