Ahmednagar News : प्रवाश्यांच्या सेवेसाठी असे ब्रीदवाक्य घेऊन गेले ७५ वर्षे अहोरात्र धावणाऱ्या एसटीने नुकताच अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. एकीकडे एसटीला स्वातंत्र्यकाळापासूनची परंपरा असताना सध्या मात्र याच एसटीच्या कर्मचाऱ्यांना आपल्या हक्काच्या पगारासाठी तिष्ठत राहण्याची वेळ आली आहे.
आज मितीला अनेक सरकारी तर सोडा पण इतर खाजगी कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दर महिन्याच्या ५ ते ७ तारखेला पगार दिला जातो. राज्यात कोणतेही सरकारी काम यात निवडणूक काळात मत पेट्याची वाहतूक करणे आदी सह अनेक कामांसाठी एसटीचा प्रामुख्याने वापर करतात.
कोरोनाच्या कठीण काळात देखील एसटीच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची बाजी लावत सेवा दिली होती. मात्र आज याच एसटीच्या कर्मचाऱ्यांना पगारासाठी रखडवले जात आहे.

आजवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना दर महिन्याच्या ७ तारखेला वर्षानुवर्षे वेतन मिळत होते परंतु संप व कोरोनापासून कधी कधी वेळेवर वेतन मिळालेले नाही.
संपानंतर न्यायालयात दिलेल्या आश्वासनानुसार, सात तारीख उलटली तरी निदान ९ तारखेपर्यंत वेतन मिळत आहे. तशी हमी राज्य शासनाने उच्च न्यायालयात दिली आहे.
परंतु जून महिन्याचे वेतन ९ तारीख उलटली तरी अद्याप कर्मचाऱ्यांच्या खात्यात आले नसल्याने कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोणाच्या आरोग्याचा प्रश्न कोणाच्या कर्जाच्या हप्त्यांचा प्रश्न, शिक्षण, दैनंदिन जीवनाचे नियोजन विस्कटत असल्याने कर्मचारी त्रस्त झाले आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी केलेल्या दीर्घकालीन संपानंतर एसटी महामंडळाला खर्चाला कमी पडणारी रक्कम सलग चार वर्षे देण्याचा ठराव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला होता .
त्या नंतर एप्रिल २०२३ मध्ये शासन निर्णय काढण्यात आला. यामध्ये खर्चाला कमी पडणारी रक्कम एक वर्ष देण्याबाबतचे परिपत्रक काढण्यात आले. त्या नंतर खर्चाला कमी पडणारी रक्कम फक्त तीन महिने देण्यात आली.
एकीकडे वेतनाला व खर्चाला कमी पडणारी रक्कम एसटीला दर महिन्याला देऊ, असे लेखी आश्वासन दीर्घकालीन संपानंतर शासनाने नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने उच्च न्यायालयात दिले होते.
पण दुसऱ्या बाजूला मात्र त्यात खोडा घालण्याचा प्रयत्न करीत असून दर महिन्याला काही ना काही अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे आर्थिक नियोजन बिघडले आहे.