श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथील सरपंच उपसरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव फेटाळला !

Ahmednagarlive24 office
Published:
grampanchayat

श्रीगोंदा तालुक्यातील राजकीयदृष्टया महत्त्वाच्या असणाऱ्या आढळगाव ग्रामपंचायतचे सरपंच शिवप्रसाद उबाळे व उपसरपंच अनुराधा ठवाळ याच्यावर सत्ताधारी आणि विरोधी गटाच्या दहा ग्रामपंचायत सदस्यांनी दाखल केलेला अविश्वास ठराव सदस्य संख्याबळा अभावी फेटाळण्यात आला.

तहसीलदार डॉ. क्षितिजा वाघमारे यांच्या उपस्थितीत झालेल्या विशेष बैठकीत अविश्वास ठराव दाखल करणाऱ्या १० सदस्यपैकी १ सदस्य गैरहजर राहिल्याने तहसिलदार यांनी अविश्वास ठराव फेटाळल्याचे जाहीर केले.

आढळगाव येथील ग्रामपंचायत कारभारात सरपंच शिवप्रसाद उबाळे व उपसरपंच अनुराधा ठवाळ हे ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेत नाही, बैठका वेळेवर घेत नाहीत, ग्रामपंचायतीचे कामकाज सदस्य समक्ष करत नाहीत असा या सदस्यांचा आरोप होता.

तसेच ग्रामपंचायतीचे पदाधिकारी मनमानी कारभार करतात, उपसरपंच महीला असुन त्यांचे पती ग्रामपंचायतिचा कारभार पाहतात या सारख्या कारणावरून सत्ताधारी तसेच विरोधी गटाच्या १० सदस्यांनी तहसीलदार डॉ क्षितिजा वाघमारे यांच्याकडे शुक्रवार दि. ५ जुलै रोजी सरपंच शिवप्रसाद उबाळे व उपसरपंच अनुराधा ठवाळ यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव दाखल केला होता.

ग्रामपंचायत अधी नियम १९५८ अनुवये कलम ३५ (२) नुसार तहसिलदार डॉ. क्षितिजा वाघमारे यांनी बुधवार दि.१० जुलै रोजी ११ वा आढळगाव येथे विशेष सभेचे आयोजन केले होते. या विशेष सभेत अविश्वास ठराव दाखल करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्य पैकी उत्तम राऊत, देवराव वाकडे, अविनाश मिसाळ, मनोहर शिंदे, अंजली चव्हाण, सीमा बोडखे, रोहिणी काळाणे, लक्ष्मी शिंदे, शालन गिरमकर हे उपस्थित होते तर नितीन गव्हाणे हे बैठकीला गैरहजर राहिले होते.

अविश्वास ठराव पारीत होण्यासाठी एकूण सदस्य संख्येच्या तीन चतुर्थांश म्हणजेच १० सदस्य उपस्थित राहत ठरावाच्या बाजूने मतदान करणे गरजेचे असताना एकूण ९ सदस्य उपस्थित राहत ठरावाच्या बाजूने मतदान झाल्याने सभेचा कोरम अपूर्ण राहिल्याने सरपंच शिवप्रसाद उबाळे, आणि उपसरपंच अनुराधा ठवाळ यांच्यावर आणलेला अविश्वास ठराव फेटाळण्यात आल्याचे पिठासिन अधिकारी तहसीलदार डॉ. क्षितिजा वाघमारे यांनी जाहीर केले.

नितीन गव्हाणे यांचे बैठकीला गैरहजर राहण्यामागे काय गौडबंगाल आहे याची सध्या पंचक्रोशीत चर्चा रंगताना दिसत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe