शेअर बाजारचा आपला चांगला अभ्यास असून आपण दोन दिवसात १० टक्के परतावा देतो, असे आमिष दाखवून एका जणाने संगमनेर तालुक्यातील तिघांची १ कोटी ८३ लाख ६६ हजारांची फसवणूक केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. याबाबत येथील शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तात्रय शंकर पवार (रा. सायखिंडी, ता. संगमनेर) यांची कुशादेव बुझबुराह (रा. जनपूर दिल्ली) याच्यासोबत ओळख झाली होती. आपण शेअर बाजाराचा व्यवसाय करतो. तुम्ही १० ते १५ लाखांची गुंतवणूक केली तर दोन दिवसात १० टक्के परतावा मिळून देतो, असे सांगून त्याने पवार यांना ऑफर दिली.
जेवढी रक्कम देणार तेवढ्या रकमेचे चेक देतो, असे त्याने सांगितले. त्यामुळे पवार यांना त्याच्यावर विश्वास बसला. त्यांनी आरोपी कुशादेव याच्या फेडरल बँकेच्या खात्यावर १५ लाख रुपये वर्ग केले. त्यानंतर पुन्हा १० लाख रुपये काही दिवसांनी वर्ग केले. त्यानंतर पुन्हा दोन दिवसांनी पुन्हा १० लाख वर्ग केले. या दरम्यान, जसजसे पैसे ट्रेडिंगमधून निघत गेले, तसे पवार यांनी आरोपीच्या खात्यावर पैसे वर्ग केले.
लाखो रुपये आल्याची खात्री झाली. तेव्हा पवार यांना विश्वास पटावा, म्हणून आरोपी कुशादेव याने पवार यांच्या खात्यावर ३ लाख, नंतर ५६ हजार आणि त्यानंतर १० लाख टाकले.
त्यानंतर पवार यांनी आरोपीच्या खात्यावर १ कोटी १२ लाख आणि रोख २५ लाख, असे १ कोटी ३७ लाख रुपये गुंतवणूक केली होती. त्यापैकी फक्त ५३ लाख रुपये पवार यांना मिळाले आहेत. जसा व्यवहार बंद झाला आणि कुशादेव ट्रेडिंगमध्ये हरला तेव्हापासून यांच्यात वाद सुरू होते.
पवार यांचे मित्र अंकुश जनार्दन नरवडे यांनी देखील १ कोटी ९२ लाख ६७ हजार ७५० रुपये बँकेत वर्ग केले. २० लाख रोख ही रक्कम याच कुशादेवकडे ट्रेडिंगसाठी दिले होते. त्यातील १ कोटी २६ लाख ९७ हजार नरवडे यांना परतावा मिळाला आहे.
त्यानंतर नरवडे यांचे मित्र शरद काशिनाथ जेडगुले यांनी देखील कुशादेवच्या खात्यात १३ लाख ४० हजार रुपये आणि रोख ५ लाख दिले होते. त्यापैकी ४ लाख ४४ हजार ४१ रुपये मिळाले आहेत.
या तिघांनी मिळून ३ कोटी ६८ लाख ७ हजार ७५० रुपये गुंतवणूक केली होती. त्यातील १ कोटी ८४ लाख ४१ हजार त्याने परत केले असून १ कोटी ८३ लाख ६६ हजार रुपये इतकी रक्कम आरोपी कुशादेव याने परत केली नाही.
उर्वरित रक्कम परत न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे पवार यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सदर फिर्यादीवरून पोलिसांनी कुशादेव बुझबुराह (रा. दिल्ली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे हे करीत आहे.