Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात सध्या अनेक चित्र विचित्र घटना पाहावयास मिळत आहेत. विविध फंडे , विविध आमिषे दाखवून फसवणाऱ्यांची तर अजिबात कमी नाही. आता एक कुशादेव आला आणि त्याने अहमदनगरमधील तिघांचे पावणे दोन कोटी रुपये घेऊन पसार झाल्याची घटना समोर आलीये.
हे तिघेही संगमनेरमधील आहेत. कुशादेव बेझबुराह (रा. दिल्ली) असे फसवणूक करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. आपण ट्रेडिंगचा व्यवसाय करतो असे सांगत या महाठगाने तिघांना फसविले.

त्यांच्याकडून एकूण ३ कोटी ६८ लाख ७ हजार ७५० इतकी रक्कम घेऊन त्यापैकी १ कोटी ८४ लाख ४१ हजार ७५० इतकी रक्कम परत करीत त्यांचा विश्वास संपादन केला. मात्र, १ कोटी ८३ लाख ६६ हजार इतक्या रकमेची फसवणूक केली.
या प्रकरणी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संगमनेर तालुक्यातील सायखिंडी येथील रहिवासी दत्तात्रय शंकर पवार (वय ३७) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
त्यांनी सांगितल्यानुसार, २०२२ ते २०२३ दरम्यान पवार यांची कुशदेव याच्याशी ओळख झाल्यानंतर आपण ट्रेडिंगचा व्यवसाय करत असल्याचे त्याने सांगितले. आपण जी गुंतवणुक करतो त्यावर एक-दोन दिवसांत कमीतकमी दहा टक्के परतावा देत असल्याचेही त्याने पटवून दिले.
सुरवातीला पवार यांनी त्याच्यावर विश्वास दाखवला नाही. परंतु तो वारंवार पवार यांच्या संपर्कात येत राहिला व तो करीत असलेल्या ट्रेडिंग व्यवसायाची माहिती देत त्याने ट्रेडिंगमध्ये कशा प्रकारे नफा कमविला हे सांगायचा.
त्यामुळे पवार यांचा विश्वास बसला व त्यांनी ३ कोटी ६८ लाख ७ हजार ७५० इतकी रक्कम त्यास दिली. त्यापैकी १ कोटी ८४ लाख ४१ हजार ७५० इतकी रक्कम कुशदेव ने त्यांना परत दिली देखील परंतु उर्वरित
१ कोटी ८३ लाख ६६ हजार इतकी रक्कम मात्र त्याने दिलीच नाही. त्याने पवार यांचे फोन उचलणे व भेटणे देखील बंद केले.