Ahmednagar News : जिल्ह्यातील ५ लाख ९६ हजार ६६० हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी झाली आहे. जवळपास १०३ टक्के पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी आजमितीस फक्त १५ टक्के पेरणी झाली होती.
यंदा शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापसाला अधिक पसंती दिली. त्यामुळे सोयाबीनची पेरणी १७३ तर कापसाची पेरणी १०७ टक्के पेरणी झाली आहे. बाजरीचा पेरा फक्त ४३ टक्के झाला आहे.
गेल्या सात वर्षात घट झाली, तर दुसरीकडे सोयाबीनच्या जिल्ह्यात बाजरीच्या क्षेत्रात निम्म्याने क्षेत्रात दुपटीने वाढ झाली आहे. खरीप हंगामात जिल्ह्यातील पीक पॅटर्न बदलू लागल्याचे दिसते. शेतकरी आता बाजरीऐवजी सोयाबीन पिकाकडे मोठ्या प्रमाणावर वळले आहेत. कपाशी लागवडीचे क्षेत्र मात्र स्थिर आहे.
खरीप हंगामात जिल्ह्यात बाजरी, मूग, सोयाबीन, उडीद, तूर, कपाशी, मका अशी पिके प्रामुख्याने घेतली जातात. एकेकाळी खरीप हंगामातील प्रमुख पीक म्हणून बाजरीची ओळख होती. मात्र, गेल्या काही वर्षात शेतकरी बाजरीऐवजी इतर पिकांकडे वळलेले दिसतात.
दीड महिन्यामध्येच १०३ टक्के पेरणीची नोंद झाली आहे. सोयाबीनसाठी ८७ हजार ३३० हेक्टर क्षेत्र असताना शेतकऱ्यांनी १ लाख ५१ हजार १९७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली आहे. कापसासाठी १ लाख २२ हजार ८७ हेक्टर क्षेत्र निश्चित असताना आतापर्यंत १ लाख ३० हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. बाजरीचा पेरा फक्त ४३ टक्के असून, मक्याच पेरा मात्र, ११३ टक्के झाला आहे.
बाजरी टाळून सोयाबीन पेरणी का वाढली ?
बाजरीला मागील दोन वर्षांत तीन हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. मात्र, त्याअगोदर अगदी पंधराशे ते दोन हजार रुपयेच भाव होता.
त्यामुळे बाजरीचे एकरी दहा ते बारा क्विंटल उत्पादन निघाले तरी फारसे पैसे मिळत नाहीत. सोयाबीननंतर घेण्यात येणाऱ्या पिकाला चांगला फायदा होतो.
सोयाबीनच्या मुळाच्या गाठींमुळे चांगले खत तयार होते. शेतात बेवड चांगला होतो. त्या शेतात शेतकरी बहुदा अलीकडे कांदा, हरभरा, मका, गहू अशी पिके घेतात.
मागील वर्षीचा अपवादवगळता सोयाबीनला बाजारभावही योग्य प्रकारे मिळत आहे. एकरी उत्पादनही आठ ते दहा क्विंटलच्या पुढे दर मिळतो. तसेच पेरणी, खुरपणी, सोंगणीही सहज सोपी असते. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल सोयाबीनकडे वाढत आहे