संजय राऊत यांचे नगर जिल्ह्यात मोठे विधान.. म्हणाले, “या स्टेजवर असे ४ लोक आहेत जे भविष्यात आमदार होणार आहेत”.. पैकी २ उमेदवार जाहीर केले…

Ahmednagarlive24 office
Published:
sanjay raut

श्रीगोंदा : शिवसेनेचे फायर ब्रँड नेते खा. संजय राऊत यांनी शिवसेना उपनेते साजन पाचपुते हे शिवसेनेचे श्रीगोंद्यातून उमेदवार असतील. ते आमदार म्हणून राणी लंके यांच्याबरोबर एकाच गाडीत विधानसभेत येतील, असे विधान करत श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ शिवसेना लढणार असल्याचे जाहीर केले आहे. एवढेच नाही तर, “या स्टेजवर असे ४ लोक आहेत जे भविष्यात महाविकास आघाडी कडून आमदार होणार आहेत”, असे म्हणत त्यांनी आणखी एक मोठे विधान करत अनेकांना बुचकाळ्यात टाकले आहे. राऊत यांचा अंगुली निर्देश नेमका कोणत्या चार संभाव्य उमेदवारांकडे आहे याबद्दल उपस्थितांमध्ये यावेळी जोरदार कुजबुज ऐकायला मिळाली.

निमित्त होते साजन पाचपुते यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाचे. राऊतांच्या हस्ते उद्घाटन पार पडल्यानंतर सभेला संबोधित करताना राऊत म्हणाले की, “श्रीगोंदा तालुक्याला आता नकली पाचपुते नव्हे तर ओरिजनल पाचपुते आमदार हवे आहेत.” राऊत यांनी भाजप आ. बबनराव पाचपुते यांचा थेट नामोल्लेख न करता जोरदार टीकास्त्र डागले. यावेळी राणीताई लंके आणि साजन पाचपुते एकाच गाडीत मुंबईला येतील असे म्हणत त्यांनी श्रीगोंद्यातून पाचपुते यांच्यासह पारनेर मधून राणीताई लंके या दोघांची उमेदवारी जाहीर केली.

राऊत एवढ्यावरच थांबले नाहीत. तर ते पुढे म्हणाले की या व्यासपीठावर चार आमदार आहेत. राऊत यांनी हे बोलताना स्टेजवर मागे वळून पाहिले. राऊतांचा नेमका रोख कुणाकडे आहे याबद्दल उपस्थितांमध्ये एकच कुजबूज सुरू झाली. मूळचे शिवसैनिक असलेले पुण्याचे वसंततात्या मोरे हे ही या व्यासपीठावर उपस्थित होते. मोरे यांनी नुकतीच पुन्हा घर वापसी करत उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवबंधन बांधले. त्यांना खडकवासला किंवा हडपसर विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उमेदवारी देणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

त्याचवेळी या व्यासपीठावर काँग्रेस नेते माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांचे निकटवर्तीय युवा नेते नगर शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे हे देखील उपस्थित होते. निलेश लंके यांच्या लोकसभेतील विजयानंतर या विजयाची परतफेड म्हणून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी श्रीगोंदा शिवसेना उबाठाला तर नगर शहर विधानसभा काँग्रेसला सोडल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे नगर शहरातून काँग्रेस कडून महाविकास आघाडीच्या वतीने काळे यांच्या उमेदवारीकडे राऊत यांच्या बोलण्याचा रोख असल्याची एकच कुजबूज उपस्थितांमध्ये यावेळी ऐकायला मिळाली. त्यामुळे येऊ घातलेल्या विधानसभेला मोरे, पाचपुते, लंके, काळे हे महाविकास आघाडीचे उमेदवार असल्यास आश्चर्य वाटू नये.

विधानसभेच्या निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजणार आहे. त्यातच राजकीय दृष्ट्या राज्यातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यात राऊत यांनी जोरदार बॅटिंग करत महाविकास आघाडीच्या तिन्ही घटक पक्षांच्या श्रीगोंदा, पारनेर विधानसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवारांची नावे थेट तर पुण्याच्या खडकवासला किंवा हडपसर मधून वसंत मोरे व नगर शहरातून किरण काळे यांच्याकडे अप्रत्यक्ष अंगुलीनिर्देश केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे आतापासूनच जिल्ह्यातील विधानसभेचे वातावरण तापू लागले आहे.

साजन पाचपुतेंकडून दिवंगत सदाशिव आण्णांबद्दल भावनिक उद्गार :
यावेळी बोलताना साजन पाचपुते यांनी आपल्या भाषणात अनेक वेळा त्यांचे वडील आणि आ. बबनराव पाचपुते यांचे ज्यांनी तब्बल २५ ते ३० वर्षे सारथ्य केले त्या दिवंगत सदाशिव आण्णांबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी ते भावनिक झाले होते. “तुम्ही आण्णांवर प्रेम केले. आज आण्णा हयात असते तर तेच या विधानसभेला आमदार झाले असते. मात्र ते नाहीत. मला पक्षाने एकदा संधी द्यावी. मी आमदार होत लोकांची आयुष्यभर सेवा करण्याचे ठरविले आहे,” असे भावनिक उदगार यावेळी साजन यांनी व्यक्त केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe