गोदावरी नदीत पाणी सोडून नाशिक जलविभागाने कोपरगावकरांच्या जखमेवर मीठ चोळले; शहराला मिळतेय १२ दिवसाआड पाणी

Published on -

Ahmednagar News : जून पाठोपाठ जुलै महिना देखील कोरडा गेला, पावसाअभावी धरणातील पाणी आटले, साठवण तलावांनी तर यापूर्वीच तळ गाठला आहे. त्यामुळे कोपरगाव शहरातील नागरिकांना १२ दिवसाआड पिण्याचे पाणी मिळत आहे. गाव, वस्त्यावर पाण्यासाठी भटकंती सुरू आहे.

अनेक भागात पावसाअभावी पिकांनी माना टाकल्या आहेत, अशा परिस्थितीत नाशिक जलविभागाने नांदूर-मध्यमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी नदीत पाणी सोडलेआहे. त्या ऐवजीजर कालव्यातुन पाणी सोडले असते तर निदान पाण्याच्या पाण्याचा तरी प्रश्न सुटला असता.

मात्र नाशिक जलविभागाने गोदावरी नदीत पाणी सोडून येथील जनतेच्या जखमेवर मीठ चोळले आहे. जल विभागाच्या या कृत्याचा येथील पंचायत समितीचे माजी सभापती सुनील देवकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे निषेध केला आहे.

याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शहराला १२ दिवसाआड पाणी मिळत आहे. तर पावसाअभावी पिकांनी माना टाकल्याने शेतकरी चिंतेत असताना, गोदावरीत पाणी सोडण्याच्या जलविभागाच्या या कृत्यामुळे कोपरगाव शहरातील नागरीकांसह शेतकरी संतप्त झाले आहेत.

सर्वत्र नाराजी व्यक्त होत आहे. नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्येही अद्याप अपेक्षीत पाण्याची आवक झालेली नाही. परंतू नांदूर-मध्यमेश्वर बंधाऱ्याचे पाणलोट क्षेत्र असलेल्या नाशिक शहर व निफाड तालुक्यात झालेल्या पावसामुळे बंधारा भरला आहे. त्यामुळे २०० क्युसेकने पाणी नुकतेच गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आलेले आहे.

गोदावरी नदीत सोडलेले पाणी उजव्या व डाव्या कालव्यांना सोडले असते, तर शेतीसह शहराचा पाणी प्रश्न काही अंशी सुटला असता. मात्र गोदावरीत पाणी सोडल्याने शेतकरी नाराज झाले आहेत. पावसाळा सुरू होऊन सव्वा महिना उलटला असताना जोरदार पाऊस येईल, या आशेने काही शेतकऱ्यांनी हजारो रुपये खर्च करून पेरणी केली आहे.

परंतु अद्याप कोपरगाव तालुक्यात जोरदार पाऊस झालेला नाही. अनेकांच्या बोअरवेल व विहिरींनी तळ गाठलेला आहे. विशेष म्हणजे कोपरगाव शहरासह गाव, खेड्यांना पाणी पुरवठा करणारे पाणी साठवण तलाव देखील कोरडे पडले आहे. कोपरगाव शहरातील नागरिकांना १२ दिवसाआड पिण्याचा पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त असताना, डोळ्यादेखत गोदावरीतून पाणी वाहून जात आहे.

कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांची व नागरिकांची पिण्याच्या पाण्याची परिस्थिती वाईट आहे. अशा परिस्थितीत पाटबंधारे विभागाने गोदावरी नदीपात्रात सोडलेले पाणी जर गोदावरी डाव्या व उजव्या कालव्यात सोडले असते तर परिसरातील शेतकऱ्यांना आपल्या शेतीला पाणी देता आले असते.

पिण्याचा पाण्याचा पुरवठा करणारे तलाव भरले असते. नागरीकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला असता. परंतु पाटबंधारे खात्याने अत्यंत चुकीच्या पद्धतीने नियोजन करत ऐन दुष्काळात गोदावरी नदी पात्रात पाणी सोडून उजव्या व डाव्या कालव्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांवर व नागरीकांवर अन्याय केल्याची भावना निर्माण झाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe