Ahmednagar News : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतअर्ज भरताना अनेक अडचणी येतात. एकाच वेळी जास्त महिलानी गर्दी केल्याने सर्व्हर डाऊन होत आहे. त्यामुळे अनेक महिला या योजनेपासून वंचित राहू नये. यासाठी महिलांकडून अर्ज भरून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून दोन दिवसीय विशेष मोहीम राबविण्यात आली. या दोन दिवसांत जिल्ह्यातून ७० हजार महिलांनी अर्ज केले असून आतापर्यंत दोन लाख अर्ज प्राप्त झाले आहेत.
या मोहिमेसाठी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनीही शिबिरांना भेट देऊन महिलांकडून अर्ज भरून घेतले.

जिल्हा प्रशासनाने मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेत जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे यासाठी १२ आणि १३ जुलै रोजी विशेष मोहीम राबविली. यामध्ये ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांनी ऑनलाइन आणि ऑफलाइन अर्ज भरले. जिल्ह्यात ग्रामपंचायत, वाडी-वस्ती आणि वॉर्डस्तरापर्यंत शिबिराचे आयोजन केले होते.
यासाठी पिण्याचे पाणी, प्राथमिक आरोग्य सेवा आणि इंटरनेट सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. विशेष मोहिमेसाठी ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, सेतू केंद्र कर्मचारी आणि नगरपालिकेचे कर्मचारी यांची पथके तयार करण्यात आली होती. या शिबिरांतून जास्तीत जास्त महिलांना अर्ज भरण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले.
महानगरपालिका, गटविकास अधिकारी, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी आणि नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना शिबिर आयोजनाबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिवसभरात जिल्ह्यातील विविध शिबिरांना भेट दिल्या. तसेच अर्ज भरून घेताना येणाऱ्या अडचणी समजून घेतल्या.
माझी लाडकी बहीण योजनेसाठी शुक्रवारी जिल्ह्यातून ४७,१९३ महिलांनी अर्ज केले होते. यामध्ये ऑनलाईन १२१,०८३, तर ऑफलाईन ३६,११० अर्जाचा समावेश होता. तोपर्यंत १ लाख ८० हजार अर्ज प्राप्त झाले होते. शनिवारी आणखी १९ हजार ७७९ अर्ज प्राप्त झाले आहेत. जिल्हा प्रशासनाकडे दोन लाख अर्ज प्राप्त झाले आहेत.