राष्ट्रीय जलआयोगाच्या अहवालानंतरच डिंभे-माणिकडोह जोड बोगद्याचे काम सुरू होणार ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

Published on -

Ahmednagar News : नगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड आणि श्रीगोंदा तालुक्यातील शेती आणि पिण्यासाठी देखील या तालुक्यातील नागरिक कुकडीच्या पाण्यावरच अवलंबून आहेत. मात्र अनेकदा याच कुकडीचे पाणी या तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना पुरेसे पाणी मिळावे यासाठी कुकडी प्रकल्पातील डिंभे-माणिकडोह जोडबोगद्याचा प्रकल्प मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. विधान परिषदेत आमदार राम शिंदे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.

कुकडी प्रकल्पातील डिंभे माणिकडोह जोडबोगद्याच्या प्रकल्पाचे काम तसेच कुकडी प्रकल्पाचे फेर जलनियोजन प्रस्तावित असून, त्याचा अभ्यास राष्ट्रीय जलआयोग नवी दिल्ली या केंद्रीय संस्थेमार्फत सुरू आहे. तो अहवाल आल्यानंतर सदर फेर जलनियोजन अंतिम झाल्यावर व कुकडी प्रकल्पाच्या चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यतेनंतर बोगद्याचे काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.

आमदार प्रा. राम शिंदे यांनी विचारलेल्या प्रश्नाला फडणवीस यांनी उत्तर दिले. शिंदे यांनी दोन प्रश्न विचारले. यामध्ये कुकडी प्रकल्पातील डिंभे-माणिकडोह जोडबोगद्याचा प्रकल्प मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याची बाब एप्रिल २०२४ मध्ये निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय? असल्यास डिंभे-माणिकडोह प्रकल्पाचे काम तातडीने पूर्ण करून शेतकऱ्यांच्या शेतीसाठी कधीपर्यंत पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने शासनाने कोणती उपाययोजना केली किंवा करण्यात येत आहे, यावर खुलासा करावा, असे शिंदे यांनी सभागृहात विचारले होते.

त्यावर फडणवीस म्हणाले, कुकडी प्रकल्पातील डिंभे डावा कालव्याच्या वहन क्षमतेच्या अडचणीमुळे सदर कालव्यास पर्याय म्हणून डिंभे माणिकडोह बोगदा करण्याची मागणी व प्रस्ताव आहे. सदर डिंभे-माणिकडोह बोगद्यास शासनाने कुकडी प्रकल्पाच्या चतुर्थ ‘सुप्रमा’ मध्ये समावेश करण्यास शासन पत्र दि. २८ जून २०२२ रोजीच्या पत्रान्वये तत्त्वतः मान्यता प्रदान केली आहे.

महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे यांनी दि. २३ जून २०२३ रोजीच्या पत्रान्वये डिंभे-माणिकडोह बोगद्याचा कुकडी प्रकल्पाच्या प्रस्ताव राज्य तांत्रिक सल्लागार समिती-२, पुणे यांच्याकडे पाठविला आहे, असे फडणवीस यांनी नमूद केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe