राहुरी मतदारसंघात माजी राज्यमंत्री, आमदार प्राजक्त तनपुरे यांची यंत्रणा महाराष्ट्र शासनाची लाडकी बहीण योजना तळागाळात पोहोचविण्यासाठी झटून काम करीत आहे. या गोष्टीचा मतदारसंघातील भाजप पदाधिकाऱ्यांना पोटशूळ उठला आहे. यापेक्षा भाजपच्या या पदाधिकाऱ्यांनी सरकारने या अर्थ संकल्पात मतदारसंघाला एक रुपयाचाही निधी का दिला नाही, असा जाब शासनाला विचारायला पाहिजे होता.
मात्र त्यांनी हे काम न करता स्वतःची निष्क्रियता झाकण्यासाठी लाभार्थी भगिनींमध्ये गैरसमज निर्माण करण्याचे पाप करू नये, असा सल्ला राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राहुरी विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष सुनील अडसुरे, राहुरी तालुकाध्यक्ष मच्छिद्र सोनवणे, कार्याध्यक्ष भारत तारडे, युवक तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर बाचकर, शहराध्यक्ष संतोष आघाव, माजी उपसभापती रवींद्र आढाव, उत्तर नगर जिल्हा राष्ट्रवादीचे सरचिटणीस सुरेश निमसे, बाजार समितीचे उपसभापती बाळासाहेब खुळे, राजेंद्र जाधव, अनिल घाडगे यांनी पत्रकात म्हटले की, कोणतीही योजना शासनाची असते.
काँग्रेसच्या काळातील संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी वृद्धापकाळ, श्रावणबाळ योजना आजही सुरू आहेत. या योजनांचे श्रेय घेण्यासाठी माजी आमदार आटापिटा करतात. त्यासाठी राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार बदलून महायुतीचे सरकार येताच तातडीने त्या योजनेवर आपल्या मर्जीतील कार्यकर्त्यांच्या निवडी करून त्याचे श्रेय माजी आमदार घेतात, हे भाजप कार्यकर्ते विसरलेत.
आमदार तनपुरे यांनी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांना ऑनलाईन व ऑफलाइन अर्ज भरण्यासाठी मोठी यंत्रणा कार्यरत केली. तशी यंत्रणा भाजपने कार्यान्वित करावी; परंतु राजकीय विरोधासाठी आमदार तनपुरे यांची यंत्रणा चुकीचे अर्ज भरत आहे.
हे अर्ज बाद होऊन सरकारविरोधात रोष वाढेल, असा अपप्रचार करून लाभार्थी भगिनींची दिशाभूल करण्याचे पाप करीत आहेत. त्यांच्या दहा वर्षांच्या निष्क्रिय कारभारामुळे जनतेने त्यांना घरी बसविले. भाजप पदाधिकाऱ्यांना त्याचा विसर पडला आहे. परंतु जनता हुशार आहे. खरे काम करणारे कोण आहे. हे जनतेला पुरेपूर समजले आहे.
राहुरी मतदारसंघात यंदाच्या अर्थसंकल्पात महायुती सरकारने विकास कामांसाठी एक छदाम निधी दिला नाही. आमदार सत्तारूढ पक्षाचे नाहीत, म्हणून मतदारसंघावर सूड उगवला, परंतु मतदारसंघ व जनता पाकिस्तानातील नाही. त्याबद्दल भाजप पदाधिकाऱ्यांनी निषेध केला पाहिजे. तेथे मूग गिळून गप्प बसणारे लाडकी बहीण योजनेत राजकारण करण्यात मश्गुल आहेत.
महाविकास आघाडी सरकारने मतदारसंघात विकासकामांना कोट्यवधीचा निधी मंजूर केला. त्या कामांना अडीच वर्षांपूर्वी महायुती सरकारने स्थगिती दिली. आमदार तनपुरे यांनी रस्त्यावर आंदोलने करून, न्यायालयात संघर्ष करून विकासकामांची स्थगिती उठविली. त्यामुळे अनेक रस्त्यांची कामे मार्गी लागली. खरे कामाचे कोण व निष्क्रिय कोण याची ओळख जनतेला पटली आहे. ते येत्या निवडणुकीत दिसणार आहे. राज्यात महायुती सरकार पायउतार होईल, असेही या पत्रकात म्हटले आहे.