वारंवार सर्व्हर डाऊन होत असल्यामुळे शैक्षणिक दाखले मिळण्यास विलंब !

Ahmednagarlive24 office
Published:

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, या योजनेमुळे ऑनलाईन कामांची संख्या अचानक वाढल्यामुळे सर्व्हर बंद पडत आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवेशासाठी आवश्यक दाखले मिळण्यास विलंब होत आहे.

दिवसभरात अति कमी प्रमाणात दाखले निकाली निघत आहेत. अनेक दाखले प्रलंबित आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना रात्री उशीरापर्यंत काम करण्याची वेळ आली आहे.

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील व्यावसायिक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया आता सुरु झाली आहे, त्यामुळे जातीचा दाखला, नॉन क्रिमिलेयर, उत्पनाचा दाखला आदी दाखले मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागते, त्यात सव्र्व्हर सातत्याने बंद पडत आहे.

त्यामुळे रात्री उशिरापर्यंतअर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असते. काहीतरी करून अर्ज दाखल झाला तरी प्रशासन अधिकाऱ्यांच्या डेस्कवर तो वेळेत दिसत नाही. – दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी तो दिसतो. त्यानंतर डेस्क-१, डेस्क -२, या प्रक्रिया पूर्ण करण्यात काही दिवस जात आहेत.

परिणामी विद्यार्थ्यांचे हे दाखले मिळण्यास उशीर होत आहे. कागदपत्रांच्या अपुर्ततेअभावी प्रवेश रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तथापि, शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली की, दरवर्षी सव्र्व्हर डाऊन होते.

गेल्या वर्षीदेखील याच स्वरूपाच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या, त्यातून राज्य शासनाने कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

शासन निर्णयाप्रमाणे शैक्षणिक किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी सवलती तसेच अन्य सुविधा मिळवण्यासाठी शासकीय कार्यालयांतून प्राप्त झालेले दाखले जोडणे आवश्यक असते.

अनेकदा वेळेवर दाखला जमा केला नाही, या कारणामुळे प्रवेश रद्द किंवा सवलती रद्द होत असल्याची उदाहरणे आहेत. वारंवार सर्व्हर डाऊन होत असल्याने विद्यार्थी व पालकांची चिंता वाढली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe