Success Story:- तरुणाईचा जर साधारणपणे ट्रेंड पाहिला तर उत्तम पद्धतीचे शिक्षण घेणे व शिक्षण पूर्ण झाल्यानंतर चांगल्या पॅकेजेची नोकरी शोधणे व नोकरी मिळाल्यानंतर त्यामध्ये सेटल होणे व त्या चाकोरीच्या बाहेर काही जीवन असते हे संपूर्ण विसरून जाणे ही साधारणपणे परिस्थिती आपल्याला दिसून येते.
परंतु ही जी काही परिस्थिती आहे ती गेल्या काही वर्षांपासून आपल्याला बदलताना दिसून येत आहे. कारण सुशिक्षित तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या तुलानेत मात्र नोकऱ्यांची उपलब्धता खूपच कमी असल्याने बरेच युवक आता व्यवसायाकडे वळत आहेत. त्यातल्या त्यात ग्रामीण भागातील अनेक तरुण आता शेतीकडे वळताना दिसून येत आहे.
परंतु असे तरुण जेव्हा शेतीमध्ये येतात तेव्हा ते त्यांचा ज्ञानाचा आणि तंत्रज्ञानाचा वापर करून पारंपारिक पद्धतीने शेती न करता तिला आधुनिक स्वरूप आणण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसून येत आहेत.
अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण उत्तर प्रदेश राज्यातील शहाजहांपूर येथील अंशुल मिश्रा या तरुणाचा विचार केला तर या तरुणाने बी टेक पूर्ण केले.परंतु नंतर नोकरीच्या मागे न लागता शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला व शेतीमध्ये ड्रॅगन फ्रुट लागवड करावी हे ठरवले व येथूनच त्याचा शेतीचा प्रवास सुरू झाला.
अंशुल मिश्रा ड्रॅगन फ्रुट लागवडीतून ठरला यशस्वी
याबाबत सविस्तर वृत्त असे की, उत्तर प्रदेश राज्यातील शहाजहांपूर येथील अंशुल मिश्रा या तरुणाने उच्च शिक्षण घेत बी टेक पूर्ण केले. त्यानंतर मात्र नोकरी न शोधता त्यांने शेती करण्याचा निर्णय घेतला.
शेती करण्याचा निर्णय घेतल्यानंतर काय करावे या विचारत असताना त्याने ड्रॅगन फ्रुट लागवड करण्याचे निश्चित केले व सोळाशे रोपांची लागवड करत ड्रॅगन फ्रुट शेतीला सुरुवात केली. आज अंशुल यांनी पाच एकर क्षेत्रामध्ये ड्रॅगन फ्रुट लागवड केली आहे व या क्षेत्रात वीस हजार रोपे त्यांनी लावली आहेत. 2018 मध्ये ड्रॅगन फ्रुटची लागवड अंशुलने केली आणि हळूहळू त्यामध्ये वाढ करत आज त्याला चांगला आर्थिक नफा या माध्यमातून मिळत आहे.
हळूहळू ड्रॅगन फ्रुट लागवडीत वाढ करून पाच एकर पर्यंत त्याचे क्षेत्र गेलेले आहे. ड्रॅगन फ्रुटला बाजारामध्ये देखील चांगली मागणी असल्यामुळे अंशुलने कष्टाने पिकवलेल्या ड्रॅगन फ्रुटला प्रति किलो दीडशे ते दोनशे रुपयांचा दर हमखास मिळतो.
त्या माध्यमातून पाच एकरातील 20000 झाडांपासून सर्व खर्च वजा जाता त्यांना वर्षाला 25 लाख रुपयांची कमाई होत असल्याचे देखील अंशुलने सांगितले. तसेच या शेती बद्दल माहिती देताना तो म्हणतो की ड्रॅगन फ्रुटची शेती तुम्ही माळरानावर देखील करू शकतात.
ठिबक सिंचनाच्या व्यवस्थेमुळे या पिकाला पाणी देखील खूप कमी लागते. ड्रॅगन फ्रुट चे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे याची एकदा लागवड केली तर पुढील 25 वर्षे तुम्हाला उत्पादन मिळत राहते. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ड्रॅगन फ्रुट शेतीकडे वळावे व आर्थिक उन्नती साधावी असा सल्लादेखील अंशुल देतो.