Ahmednagar News : नगर शहरातील रस्त्यांची दुर्दशा हा नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतो. दरम्यान आता मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या कामांचा मार्ग मोकळा झाला असून नगर शहर व उपनगर परिसरातील २४ रस्त्यांचे कामी लवकरच मार्गी लागणार आहे.
राज्य शासनाने मंजूर केलेले परंतु व आचारसंहितेमुळे गेल्या तीन महिन्यांपासून हे रस्तेकाम रखडलेले होते. दरम्यान आता या २४ रस्त्यांच्या कामांची निविदा प्रशासक यशवंत डांगे यांनी मंजूर केली असल्याने हे रस्ते लवकरच होणार असून नगरकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

जवळपास १५ वर्षांपासून रखडलेला पत्रकार चौक ते नेप्ती चौक रस्ता, आठ वर्षांपासून रखडलेला झोपडी कॅन्टीन ते गंगा उद्यान ते नवीन जिल्हाधिकारी कार्यालय रस्ता, १० वर्षांपासून रखडलेला एकविरा चौक ते तपोवन रस्ता,
तसेच केडगाव, बुरूडगाव रस्ता, सारसनगर, मध्य शहर, सावेडी उपनगर, पाईपलाईन रस्ता, बोल्हेगाव भागातील दुरावस्था झालेल्या प्रमुख रस्त्यांची कामे आता मार्गी लागणार आहेत.
१४९.६७ कोटी मंजूर, १०४.७७ कोटी राज्य देणार, ४४.९० कोटी मनपा देणार
या प्रस्तावित रस्त्यांसाठी जवळपास १४९.६७ कोटी रुपये शासनाने नगरोत्थान योजनेतून दिलेले आहेत. दरम्यान यापैकी १०४.७७ कोटी रुपये राज्य सरकार देणार आहे.
तर ४४.९० कोटींचा स्वहिस्सा मनपाला उपलब्ध करावा लागणार आहे. वेळप्रसंगी मनपाला यासाठी कर्ज घेण्याची मुभा देण्यात आली असून त्यासाठी मात्र शासनाची परवानगी घ्यावी लागेल.
शहरातील ११४ रस्त्यांची कामेही मार्गी लागणार
निवडणुकीपूर्वी राज्य शासनाकडून १३८ रस्त्यांना २३४.५२ कोटींचा निधी मंजूर आहे. यात शहरातील प्रमुख २४ रस्त्यांसाठी १४९.६७ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता.
त्यानंतर शहरातील अंतर्गत ११४ रस्त्यांसाठी ८४.८५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. या कामांची निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे. त्याच्या निविदा आठवडाभरात मंजूर होणार आहेत.