पोहेगाव झगडे फाटा येथे उभ्या असलेल्या एका मालवाहू ट्रकच्या चालकाला बंदूकीचा धाक दाखवत डिझेल टाकीतून नुकतेच ४०० लिटर डिझेल चोरी केले गेले. काल गुरूवारी (दि. १८) पहाटेच्या सुमारास झालेल्या डिझेल चोरीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अशोक लेलॅन्ड कंपनीचा (आरजे ११ जीसी ४५०५) क्रमांकाचा मालवाहू ट्रक यूपीकडून झगडे फाटा मार्गे इंदापूर येथे मका घेऊन जात असताना झगडे फाटा येथे मालट्रकचा गिअर बॉक्स नादुरुस्त झाला.
त्यामुळे हा मालट्रक रस्त्यावरच जागेवर थांबवावा लागला. त्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी हा ट्रक ढकलून रस्त्याच्या एका बाजूला उभा केला. काल गुरूवारी (दि.१८) पहाटे तीन वाजेच्या सुमारास अज्ञात ६ ते ७ चोरट्यांनी चालकाला बंदूकीचा धाक दाखवून डिझेलच्या टाकीतील जवळपास ४०० लिटर डिझेल चोरून नेल्याची माहिती ट्रकचालक पंकज सिंग यांनी दिली.
या ट्रकमध्ये धुळे येथील पेट्रोल पंपावर (दि.१३) रोजी दुपारी १२:३० वाजता ३६० लिटर डिझेल टाकल्याची पावती चालकाने दाखवली. ही ट्रक १३ तारखेला रात्री १० वाजता झगडे फाटा या ठिकाणी पोहोचली. परंतु अचानक गिअर बॉक्स नादुरुस्त झाला.
मात्र ही ट्रक सहा महिन्यापूर्वीच नवीन खरेदी केलेली असल्यामुळे कंपनीच्या नियमाप्रमाणे बिघाड झाल्यानंतर आहे, त्याच जागेवर पाहणी होईपर्यंत ट्रक उभी करावी, असे कंपनीने सांगितल्यामुळे गाडी मालकाने चालकाला गाडी तेथेच उभी करून ठेवायला सांगितले.
त्यानंतर काल गुरूवारी पहाटे ३ वाजता ही चोरी झाल्याचे चालकाने सांगितले. चांदेकसारे परीसरात कृषीपंप, केबल, मोटरसायकल तसेच डिझेल चोरीच्या अनेक घटना गेल्या ६ महिन्यात घडलेल्या आहे. परंतु अद्याप एकाही चोरीचा तपास लागलेला नाही. त्यामुळे पोलिसांच्या कामगिरीवर नागरिकांनी सवाल उपस्थित केला आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी झगडे फाटा येथे रस्त्याच्या दोन्ही बाजूला पथदिवे व मध्यभागी हायमास्ट लावलेला आहे. मात्र सदर दिवे व हायमास्ट सतत बंद असतात. प्राधिकरणाचे याकडे लक्ष वेधण्यासाठी या अगोदर अनेकदा बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. मात्र संबंधित यंत्रणेने त्याकडे दुर्लक्ष केले.
त्यामुळे वाहतुक व्यवस्था नेमकी काय करते, असा सवाल परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे. या भागातील सतत वाढलेल्या डिझेल, कृषीपंप, केबल, मोटरसायकल चोऱ्या, वाढलेले अपघाताचे प्रमाण तसेच राष्ट्रीय महामार्गामुळे अवजड वाहतूक तसेच शिर्डीकडे जाणाऱ्या साई भक्तांची मोठी वर्दळ असल्याने झगडे फाटा या ठिकाणी कायमस्वपी पोलीस चौकी उभारून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.